JEE परीक्षा 24 तासांवर अन् विजेचा खेळखंडोबा, अभ्यासावर परिणाम

जेईई अॅडव्हान्सची परीक्षा 24 तासांवर ...अन विजेचा खेळखंडोबा सुरूच
नांदेड,दि.24(डि-24 न्यूज) देशपातळीवर महत्त्वाची असलेली जेईई ॲडव्हान्सची परीक्षा रविवार दिनांक 26 रोजी एकाच दिवशी संपूर्ण देशभरात पार पडत आहे. यासाठी विद्यार्थी 16 ते 18 तास अभ्यास करत असताना गेल्या आठ दिवसांपासून दररोज नांदेड शहरात विजेचा खेळखंडोबा होत आहे. रात्री दोन- तीन वाजेपर्यंत वीज खंडित केली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर खूप मोठा परिणाम होत आहे. यामुळेच मराठवाड्यातील विद्यार्थी कदाचित देशाच्या मोठमोठ्या परीक्षेत व स्पर्धेत मागे पडतात की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. यासाठी महावितरणने किमान अशा मोठ्या परीक्षा काळात तरी वीज खंडित करू नये, अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे.
जेईई मेन्स परीक्षेत 93% अधिक पर्सेंटाइल असणाऱ्या विद्यार्थ्यांची जेईई ऍडव्हान्ससाठी निवड झालेली आहे. नांदेड शहरात असे शेकडो विद्यार्थी आहेत, जे ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. आयआयटी सारख्या मोठ्या शैक्षणिक संकुलात प्रवेश मिळविण्यासाठी रविवारी होणारी ऍडव्हान्सची परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे. संपूर्ण देश पातळीवर एकाच दिवशी ही परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे. यासाठी विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून मेहनत घेत आहेत. अशा परिस्थितीत सध्या गेल्या महिन्याभरात नांदेड शहरातील वजीराबाद, शिवाजीनगर ,महावीर चौक, भाग्यनगर या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. विशेष म्हणजे रात्री सातच्या नंतर मध्यरात्री दोन - तीन वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर खूप मोठा परिणाम होत आहे. सगळ्यांच्याच घरी इन्व्हर्टर किंवा अन्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अंधारात विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्यच नाही. अशा परिस्थितीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचा होत असलेला गोंधळ लक्षात येत नसावा का ? असा प्रश्न पालक वर्गातून उपस्थित होत आहे. किमान रविवारपर्यंत तरी महावितरणने थोडाही वेळ वीज पुरवठा खंडित करू नये व विद्यार्थ्यांना देश पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविण्यासाठी हातभार लावावा अशीही मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महावितरणला वीजपुरवठा खंडित न करण्याची सक्त ताकीद द्यावी , अशी ही मागणी होत आहे.
What's Your Reaction?






