पोलिस हवालदाराने 40 लाखांची फसवणूक केल्याने पोलिस दलात खळबळ, कुटुंबातील तीन सदस्यांवर गुन्हा दाखल

 0
पोलिस हवालदाराने 40 लाखांची फसवणूक केल्याने पोलिस दलात खळबळ, कुटुंबातील तीन सदस्यांवर गुन्हा दाखल

पोलिस हवालदाराने 40 लाखांची फसवणूक केल्याने पोलिस दलात खळबळ, कुटुंबातील तीन सदस्यांवर गुन्हा दाखल...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)-  शहरातील एका पोलीस हवालदाराने बायको आणि भावाच्या संगणमताने एका महिलेला तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूकीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात पोलीस हवालदार मिर्झा बिस्मिल्ला बेग, त्यांची पत्नी मिर्झा यास्मीन बेगम आणि भाऊ मिर्झा अजमत बेग या तिघांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची हकीकत अशी पोलीस आयुक्तांनी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसीन खान यांनी चौकशी केली असता, तिन्ही आरोपींनी संगणमताने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा क्रमांक 371/2025, कलम 316(3), 318(1) आणि 3(5) भारतीय न्याय संहितेनुसार सिटी चौक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महिला फिर्यादी ह्या शहरातील सुप्रसिद्ध बिल्डर अब्दुल्ला खान मार्कोनी, रा. ब्लॉक नं. 12/8, कोहिनूर कॉलनी, पानचक्की रोड यांच्या पत्नी असून त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,

त्यांचे पती अब्दुल्ला खान यांच्या नावावर रावरसपुरा येथे गट नं. 13/1 मध्ये 18 गुंठे जमीन असून त्यातील 625 चौ.मी. जमीन श्रीमती मिर्झा यास्मीन बेगम मिर्झा बिस्मिल्ला बेग यांना भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी दिली होती.

ऑक्टोबर 2023 मध्ये मिर्झा यास्मीन बेगम, त्यांचे पती पोलीस हवालदार मिर्झा बिस्मिल्ला बेग व त्यांचा भाऊ मिर्झा अजमत बेग हे फिर्यादींच्या घरी आले आणि त्यांनी सांगितले की, पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी त्यांना 40 ते 50 लाख रुपयांची आवश्यकता आहे. तुम्ही आम्हाला पैसे दिल्यास पेट्रोलपंप लवकर सुरू होईल व दोन महिन्यांत पैसे परत करू, तसेच थोडी जास्त रक्कम देऊ, असे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला.

यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या दोन मुलींनी मिळून एकूण 40 लाख रुपये मिर्झा यास्मीन बेगम यांच्या बँक ऑफ बडौदा खात्यात 9 आणि 10 नोव्हेंबर 2023 रोजी आरटीजीएसद्वारे पाठवले.

फेब्रुवारी 2024 मध्ये पेट्रोलपंप सुरू झाला. मात्र, पैसे परत मागितल्यावर सुरुवातीला "थोडं थांबा" असे सांगण्यात आले, आणि नंतर रक्कम परत करण्यास पूर्ण नकार देण्यात आला. परिणामी, फिर्यादीने आर्थिक फसवणुकीची तक्रार पोलीस आयुक्तांकडे दाखल केली.

प्राथमिक चौकशीत आर्थिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले की, मिर्झा बिस्मिल्ला बेग (पोलीस हवालदार, बेगमपुरा पोलीस स्टेशन), त्यांची पत्नी मिर्झा यास्मीन बेगम आणि भाऊ मिर्झा अजमत बेग यांनी संगणमत करून फिर्यादींकडून 40 लाख रुपये घेतले आणि परत न करता फसवणूक केली.

विशेष म्हणजे, आरोपी मिर्झा बिस्मिल्ला बेग हे पोलीस खात्यात येण्यापूर्वी सैन्यात कार्यरत होते, तर सध्या ते बेगमपुरा पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून नोकरीवर आहेत.

या प्रकरणामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली असून, स्वतः पोलीस असलेला हवालदारच फसवणुकीत सहभागी झाल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे.

सदर पेट्रोलपंप दौलताबाद रोडवर आहे. या ठिकाणी केवळ फिर्यादींचीच नव्हे, तर भारत पेट्रोलियम कंपनीचीही दिशाभूल झाल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली आहे.

या गंभीर फसवणूक प्रकरणात अद्याप तिन्ही आरोपींना अटक झालेली नाही. मात्र, पोलीस हवालदाराने स्वतःच्या पदाचा गैरवापर करून केलेली फसवणूक उघड झाल्याने पोलीस विभागात आणि शहरात मोठी खळबळ माजली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow