नारेगावातून 1 किलो 56 ग्राम गांजा जप्त, एका आरोपीवर गुन्हा दाखल
नारेगावातून 1 किलो 56 ग्रॅम गांजा जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर, दि. 11 (प्रतिनिधी) : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नारेगाव परिसरात कारवाई करत विक्रीसाठी आणलेला 1 किलो 56 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. या कारवाईत एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस उपनिरीक्षक उमेश्वर मुंडे व पथकातील अंमलदारांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. नारेगाव येथील एमआयडीसी सिडको परिसरात इसम नामे चरणसिंग मदनसिंग मलके (वय 50) हा महादेव मंदिराच्या पाठीमागे गांजाची चोरीछुपी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत 1 किलो 56 ग्रॅम गांजा, एक मोबाईल हँडसेट, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि रोख रक्कम, असा एकूण 67 हजार 221 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद व पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोउपनि उत्रेश्वर मुंडे, पोहेकॉ/अंमलदार भाउसिंग चव्हाण, पोहेकॉ नारायण पायघन, पोअं/सतीश जाधव, मपोअं/छाया लांडगे, पोअं देशराज मोरे, पोअं सरताज पठाण, पोअं विशाल मेटे तसेच चालक पोअं विठ्ठल पवार यांचा समावेश होता.
What's Your Reaction?