पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर धिंगाणा करणाऱ्या तीन आरोपींना अटक....

 0
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर धिंगाणा करणाऱ्या तीन आरोपींना अटक....

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा; तीन उच्चशिक्षित आरोपींना अटक

दारूच्या बाटल्या फेकल्या, सुरक्षारक्षकांशी धक्काबुक्की आणि शिवीगाळ; ‘मी चार ओएसडी खिशात घालून फिरतो’ म्हणत घातला गोंधळ

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 13 (डि-24 न्यूज) : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी लिंक रोडवरील निवासस्थानासमोर मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत आलेल्या तीन तरुणांनी मोठा गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. बंगल्याच्या दिशेने दारूच्या बाटल्या फेकणे, सुरक्षारक्षकांशी वाद घालणे, धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत थेट निवासस्थानाच्या गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी सातारा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

रोहित स्वप्निल भुताळे (वय 24), शिवम ज्ञानेश्वर गायकवाड (वय 24) आणि प्रतीक चांगदेव कुटे (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे तिन्ही आरोपी उच्चशिक्षित असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

दारूच्या बाटल्या फेकून सुरक्षारक्षकांशी वाद

12 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास तिन्ही तरुण एमएच-23-बीआर-853 क्रमांकाच्या मोपेडवरून पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आले. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या तरुणांनी सुरक्षारक्षक कमलेश परदेशी आणि संतोष महालकर यांच्याशी वाद घालत झटापट केली. यावेळी बंगल्याच्या दिशेने दारूची बाटली फेकण्यात आली, तर दुसरी बाटली फोडण्यात आली. बंदोबस्तावर असलेले पोलिस अंमलदार विजय दारुंटे यांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीने तिघांना तेथून हुसकावून लावले.

पुन्हा बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न

काही वेळानंतर तिन्ही तरुण त्याच मोपेडवरून पुन्हा निवासस्थानाबाहेर आले. यावेळी त्यांनी बंगल्याच्या गेटमधून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिस अंमलदार विजय दारुंटे, सुरक्षारक्षक आणि बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविले. मात्र, आरोपींनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत धक्काबुक्की आणि शिवीगाळ सुरू केली.

‘मी चार ओएसडी खिशात घालून फिरतो’

आरोपींपैकी एका तरुणाने आपण ओएसडी असल्याची बतावणी केली. ‘माझी वरपर्यंत ओळख आहे, मी चार ओएसडी खिशात घालून फिरतो,’ अशी भाषा वापरत त्याने कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शासकीय कर्तव्य बजावत असताना आरोपींनी अडथळा आणून धक्काबुक्की केल्याचे पोलिस अंमलदार विजय दारुंटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

डायल 112 वर संपर्क; पोलिस पथक दाखल

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अंमलदार दारुंटे यांनी डायल 112 वर संपर्क साधला. त्यानंतर सातारा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिन्ही आरोपींसह त्यांची मोपेड ताब्यात घेतली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 333, 132, 351(2), 351(3), 352, 355 आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिन्ही आरोपी उच्चशिक्षित

अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या शैक्षणिक पार्श्वभूमीची माहितीही समोर आली आहे. रोहित भुताळे हा जर्मनीमध्ये अभियंता असून त्याने सायबर सिक्युरिटी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तो सिडको एन-1 परिसरातील रहिवासी आहे. शिवम गायकवाड याने औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरण विषयात एमएससीचे शिक्षण पूर्ण केले असून तो सध्या शहरातील सरस्वती कॉलनीत राहतो. मूळचा बीड जिल्ह्यातील गेवराईचा रहिवासी असलेला शिवम सध्या उल्कानगरी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर प्रतीक कुटे याचे औषधनिर्माणशास्त्रातील शिक्षण झाले असून तो मेडिकल डिकोडिंग क्षेत्रात खासगी नोकरी करतो.

घटनेपेक्षा पोलिसांच्या प्रतिसादावर नाराजी

या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिस यंत्रणेच्या प्रतिसादाबाबत नाराजी व्यक्त केली. पोलिस आयुक्तांचा फोन बंद येत होता, डीसीपींशी संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही, तसेच सहायक आयुक्तांनीही तातडीने दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. अखेर पोलिस महासंचालक डॉ. सदानंद दाते यांच्याशी संपर्क साधल्याचे समजते. त्यामुळे या घटनेनंतर बंगल्याच्या सुरक्षेबरोबरच शहरातील पोलिस यंत्रणेच्या तत्परतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

हल्ल्यामागील उद्देशाचा तपास सुरू

पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर घडलेल्या या प्रकारामागील नेमके कारण काय, आरोपींचा उद्देश काय होता आणि या घटनेशी संबंधित इतर काही बाबी आहेत का, याचा पोलिस तपास सुरू आहे.

— रत्नाकर नवले, पोलिस उपायुक्त

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow