मस्जिदीतून उजळली ज्ञानाची ज्योत, शेंद्रा येथे मोहल्ला बाल वाचनालयाचे उद्घाटन...

 0
मस्जिदीतून उजळली ज्ञानाची ज्योत, शेंद्रा येथे मोहल्ला बाल वाचनालयाचे उद्घाटन...

मस्जिदीतून उजळली ज्ञानाची ज्योत; शेंद्रा येथे 41 व्या ‘मोहल्ला बाल वाचनालया’चे उद्घाटन...

2026 सालातील 26 वाचनालयांच्या संकल्पातील सहावा टप्पा पूर्ण

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- बालमनावर वाचनाचे संस्कार रुजवण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबविल्या जाणाऱ्या 'मरयम मिर्झा मोहल्ला मोहल्ला बाल वाचनालय अभियाना'ने आज एक नवा टप्पा गाठला. शेंद्रा (एमआयडीसी) येथील जामा मशीद (मदरसा तालीमूल कुरआन) मध्ये या अभियानाच्या 41 व्या शाखेचे (वाचनालय व अभ्यासिका) भव्य उद्घाटन करण्यात आले. मशिदीसारख्या पवित्र ठिकाणी मुलांसाठी अभ्यासाचे केंद्र सुरू करणे, हे सामाजिक परिवर्तनाचे एक दूरदर्शी पाऊल मानले जात आहे.

‘मायक्रो फंडिंग-मायक्रो लायब्ररी’ची यशस्वी संकल्पना याप्रसंगी ‘रीड अँड लीड फाउंडेशन’चे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी अभियानाची माहिती दिली. मरयम मिर्झा यांचे हे मिशन "मायक्रो फंडिंग, मायक्रो लायब्ररी, नो कन्स्ट्रक्शन, नो रेंट" या तत्त्वावर आधारित आहे. अत्यल्प खर्चात मोहल्ल्यातच मुलांना पुस्तके उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. अब्दुल कय्यूम नदवी यांनी पुढे सांगितले की, "आम्ही 2026 या वर्षात 26 नवीन बाल वाचनालये सुरू करण्याचा संकल्प केला असून, आज उद्घाटन झालेले वाचनालय हे या वर्षातील सहावे (6 वे) वाचनालय आहे."

वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्ञानाची भेट हे वाचनालय जनाब अब्दुल सत्तार खां यांनी आपले वडील हाजी सरदार खां यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गावच्या मुलांसाठी सुरू केले आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादावे, या हेतूने ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे.

मान्यवरांची उपस्थिती वाचनालयाचे उद्घाटन मुख्य अतिथी जनाब लालखां रसूलखां पठाण यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी हाफिज मोहसीन, अनवर पठाण, इम्रान पठाण, अन्सार पठाण, रशिद शाह, बाबा पठाण, हबीब पटेल, हाजी मोईनोद्दिन, हाफिज जुबेर इशाअती, मिर्झा हारून बेग, मौलाना अनीसखां नदवी आणि जनाब अब्दुल सत्तार खां यांची प्रमुख उपस्थिती होती. मशिदीतील या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, मुलांचे मोबाईलचे व्यसन सोडून त्यांना पुस्तकांच्या जगाकडे वळवण्यासाठी हे सुरक्षित वातावरण मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

ठळक वैशिष्ट्ये:

अभियान: मरयम मिर्झा मोहल्ला बाल वाचनालय (41 वी शाखा).

संकल्प: 2026 सालातील 26 वाचनालयांपैकी 6 वे पूर्ण. ठिकाण: जामा मशीद, शेंद्रा एमआयडीसी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow