घरकुल योजनेच्या लकी ड्रॉ यादीवरून मनपावर काँग्रेसचे गंभीर आरोप...
घरकुल योजनेच्या लकी ड्रॉ यादीवरून मनपावर गंभीर आरोप
तिसरी व चौथी यादी सार्वजनिक न करता बिल्डरच्या हाती दिल्याची काँग्रेस माथाडी कामगार संघटनेचे सैय्यद अशफाक अलीची तक्रार
पडेगाव गट क्र. ६९, तीसगाव गट क्र. २२५/१ (ब्लॉक A-B) व तिसगाव गट क्र. २२७/१ (A-B-C) प्रकरणी पारदर्शकतेची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - शहरातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या लकी ड्रॉ प्रक्रियेवरून महानगरपालिका प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. लाभार्थ्यांची तिसरी व चौथी यादी सार्वजनिकरीत्या जाहीर न करता ती बिल्डरच्या हाती देण्यात आल्याचा आरोप काँग्रेस माथाडी कामगार मराठवाडा सरचिटणीस सैय्यद अशफाक अली यांनी केला आहे. या प्रकारामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शनिवारी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची लकी ड्रॉ यादी सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. विशेषतः तिसरी व चौथी यादी नागरिकांसमोर जाहीर न करता संबंधित बिल्डरच्या हाती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकल्पांबाबत उपस्थित केले प्रश्न
घरकुल योजनेतील पडेगाव गट क्रमांक ६९, तीसगाव गट क्रमांक २२५/१ (ब्लॉक A-B) तसेच तिसगाव गट क्रमांक २२७/१ (A-B-C) या प्रकल्पांशी संबंधित लाभार्थ्यांच्या याद्यांबाबत पारदर्शकता राखण्यात यावी, अशी मागणी सैय्यद अशफाक अली यांनी केली आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी...
याबाबत बोलताना सैय्यद अशफाक अली यांनी आरोप केला की, घरकुल योजनेतील महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून लाभार्थ्यांची तिसरी व चौथी लकी ड्रॉ यादी सर्वांसमोर जाहीर न करता बिल्डरच्या हाती सोपविली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणे आवश्यक आहे.
अधिकृत यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करा...
लकी ड्रॉमध्ये निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांची अधिकृत यादी महानगरपालिकेने आपल्या संकेतस्थळावर तसेच संबंधित कार्यालयात सार्वजनिक करावी. त्याचबरोबर लकी ड्रॉची संपूर्ण प्रक्रिया, निवड निकष, प्रकल्पनिहाय लाभार्थ्यांची संख्या आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांची नावे नागरिकांसमोर स्पष्ट करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
“घरकुल हा नागरिकांचा हक्क”
“घरकुल योजनेचा लाभ मिळणे हा सर्वसामान्य नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची यादी गुप्तपणे कोणाच्याही हाती देण्याऐवजी ती अधिकृतरीत्या सार्वजनिक करणे आवश्यक आहे. तिसरी व चौथी यादी सार्वजनिक का करण्यात आली नाही, याची चौकशी करण्यात यावी. तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणी सैय्यद अशफाक अली यांनी केली.
दरम्यान, घरकुल योजनेच्या लकी ड्रॉ प्रक्रियेबाबत करण्यात आलेल्या या आरोपांमुळे लाभार्थ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. तिसरी व चौथी यादी सार्वजनिक न करता बिल्डरच्या हाती देण्यात आल्याच्या आरोपावर महानगरपालिका प्रशासन काय स्पष्टीकरण देते, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?