जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी आमदार विलास भुमरे तर उपाध्यक्ष पदी रामुकाका शेळके बिनविरोध...!
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी भुमरे, उपाध्यक्षपदी शेळके यांची बिनविरोध निवड
छत्रपती संभाजीनगर, दि. 20(डि-24 न्यूज) – औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार विलास भुमरे, तर उपाध्यक्षपदी भाजपा नेते तथा संचालक रामूकाका शेळके यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. महायुतीतील समन्वयामुळे ही निवड प्रक्रिया कोणत्याही वादाविना पार पडली.
जिल्हा बँकेच्या मुख्य सभागृहात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. संचालक मंडळाने एकमताने दोन्ही पदांसाठीच्या नावांना मंजुरी दिली.
यापूर्वी अध्यक्षपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस असल्याची चर्चा रंगली होती. मात्र महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर तोडगा निघाल्याने अध्यक्षपद शिवसेनेकडे, तर उपाध्यक्षपद भाजपकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही पदांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
निवडीनंतर आमदार विलास भुमरे आणि रामूकाका शेळके यांचे संचालक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, आमदार अब्दुल सत्तार तसेच महायुतीतील पदाधिकारी तसेच बँकेचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष विलास भुमरे यांनी सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याची ग्वाही दिली. उपाध्यक्ष शेळके यांनीही बँकेच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
महायुतीतील समन्वयामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा एकजूट दिसून आली असून, या निवडीचे सहकार क्षेत्रात स्वागत करण्यात येत आहे.
महायुतीच्या वतीने दोन वर्षे शिंदे सेनेला अध्यक्षपद तर उपाध्यक्ष पद भाजपाला यानंतर भाजपाचा अध्यक्ष व उपाध्यक्ष शिंदे सेनेला मिळेल. शेवटचे एक वर्ष अजित पवार गटाला अध्यक्षपद मिळेल असा निर्णय समन्वयाने घेण्यात आला. याला सर्व संचालकांनी मान्यता दिली.
What's Your Reaction?