पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष मेळावा, सभापती अनिल मकरिये यांनी केले उद्घाटन...
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थ्यांसाठी विशेष मेळावा; घराच्या स्वप्नपूर्तीसाठी मनपा, विकासक आणि बँकांचा एकत्रित पुढाकार
छत्रपती संभाजीनगर, दि. 16(डि-24 न्यूज)- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत शहरातील विविध ठिकाणी गृहप्रकल्पांची कामे सुरू असून हर्सूल येथे गट क्रमांक 216 येथील एकूण 504 सदनिकांच्या प्रकल्पासंदर्भात आज लाभार्थ्यांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन मा.स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरिये यांच्या हस्ते करण्यात आले.
अशा प्रकारचा लाभार्थी मेळावा आयोजित करण्याची संकल्पना महापौर श्री. समीर राजूरकर, उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ आणि स्थायी समिती सभापती श्री. मकरिये यांनी मांडली होती. त्यानुसार मा. आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकारातून प्रथमच हर्सूल येथील प्रकल्पस्थळी हा मेळावा आयोजित करण्यात आला.
महानगरपालिकेच्या वतीने शहरातील पाच ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प राबविण्यात येत आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात लॉटरी प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या सुमारे 350 लाभार्थ्यांसह दुसऱ्या टप्प्यातील लॉटरी प्रक्रियेत सहभागी नागरिकांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
लाभार्थी, विकासक, महानगरपालिका प्रशासन आणि विविध बँकांचे प्रतिनिधी यांना एकाच छताखाली आणून नागरिकांना गृहकर्ज प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि सहज पद्धतीने पूर्ण करता यावी, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. यावेळी उपस्थित बँक प्रतिनिधींनी गृहकर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, व्याजदर, मासिक हप्ते तसेच कर्ज मंजुरी प्रक्रियेबाबत लाभार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
मार्गदर्शन करताना सभापती श्री. अनिल मकरिये यांनी लाभार्थ्यांना आवाहन केले की, लकी ड्रॉमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी येत्या 22 मेपर्यंत आवश्यक 10 टक्के रक्कम जमा करावी, जेणेकरून शासनाचा पुढील हप्ता उपलब्ध होऊन गृहप्रकल्पाचे बांधकाम वेगाने पूर्ण करता येईल. तसेच त्यांनी विकासकांकडून एका वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण करून लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्याचे आश्वासन घेत उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला.
यावेळी सारा बिल्डर्सचे श्री. सीताराम अग्रवाल, श्री. निलेश अग्रवाल, पीएमसीचे श्री. लक्ष्मीकांत सुर्वे, श्री. स्वप्निल श्रॉफ, अतिरिक्त आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे, उपायुक्त श्रीमती अपर्णा थेटे तसेच प्रधानमंत्री आवास योजना विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच आवास फायनान्स, स्वतंत्र फायनान्स, वंडर फायनान्स, टायगर फायनान्स, IIFL Finance, Piramal Finance, State Bank of India आणि Devgiri Bank यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभिनव उपक्रमामुळे लाभार्थी आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यात विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले असून अनेक कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आ
ली.
What's Your Reaction?