प्रस्तावित ग्लो गार्डन प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा - डाॅ.भागवत कराड

 0
प्रस्तावित ग्लो गार्डन प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा - डाॅ.भागवत कराड

प्रस्तावित 'ग्लो गार्डन' प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा – राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांचे निर्देश

 प्रकल्पामध्ये आधुनिक विद्युत प्रकाशयोजनेचे आकर्षक घटकांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) -

शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि पर्यटकांना आकर्षित करणारा 'ग्लो गार्डन' प्रकल्प तात्काळ पूर्णत्वास न्यावा, अशा सूचना राज्यसभा खासदार व माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज दिल्या.

स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत डॉ. कराड यांनी ग्लो गार्डनच्या कामाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या प्रगतीवर समाधान व्यक्त करत, उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला.

या बैठकीस छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, शहर अभियंता फारुख खान, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता मोहिनी वारभुवन, उप अभियंता संजय चामले, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, तसेच ग्लो गार्डन प्रकल्पाचे गुत्तेदार आणि PMCs (Project Management Consultants) यांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान एम. आर. इलेक्ट्रिकल्स या कार्यकारी संस्थेकडून प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. त्यांनी प्रकल्पामध्ये वापरण्यात येणाऱ्या लक्षवेधी विद्युत घटकांची माहिती दिली. यामध्ये लाईट टनेल्स, सेल्फी पॉइंट्स, ग्लोइंग ट्रीज, पिक्सल लाईट टॉवर्स, मल्टिपल कलर हँगर्स आदी तंत्रज्ञान वापरून साकारण्यात येणाऱ्या आकर्षक घटक व खेळणी यांचा समावेश आहे.

स्वामी विवेकानंद उद्यानाच्या मागील बाजूस सुमारे दोन एकर जागा या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासंदर्भात, डॉ. कराड यांनी 'ग्लो गार्डन' प्रकल्पासाठी जागा वाढवून देण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले.

याचबरोबर, प्रकल्पातील वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी सध्याचा 70 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प वाढवून 100 किलोवॅट क्षमतेपर्यंत नेण्याचे आदेश त्यांनी दिले. यामुळे प्रकल्प स्वयंपूर्ण आणि ऊर्जा-स्वावलंबी होईल.

डॉ. कराड यांनी विश्वास व्यक्त केला की, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहराच्या पर्यटनवाढीस मोठी चालना मिळेल. स्थानिक तसेच बाहेरील पर्यटकांसाठी हे उद्यान एक आकर्षणाचे ठिकाण ठरेल. शहराच्या सौंदर्यात भर पडत असताना, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर हे प्रकल्पाचे वैशिष्ट्य ठरेल, असेही ते म्हणाले.

महानगरपालिका प्रशासनाने या प्रकल्पास प्राधान्याने हाताळून वेळेत पूर्ण करावे, असेही डॉ. कराड यांनी यावेळी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow