अटक वारंटची कारवाई टाळण्यासाठी मागितली 5 हजारांची लाच, पोलिस हेड काॅन्स्टेबलला रंगेहाथ पकडले
अटक वॉरंटची कारवाई टाळण्यासाठी 5 हजारांची लाच मागितली; तडजोडीनंतर 3 हजार स्वीकारताना पोलीस हेड कॉन्स्टेबल जाळ्यात
गंगापूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; शकील शेख यांना ताब्यात घेतले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 10 (डि-24 न्यूज) : अटक वॉरंटची कारवाई न करता मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 3 हजार रुपये स्वीकारणाऱ्या गंगापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून रंगेहाथ पकडले. शकील सत्तार शेख (वय 42), नेमणूक पोलीस ठाणे गंगापूर, असे ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
ACBकडे 30 वर्षीय मजूर तक्रारदाराने 10 सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या नावाने अटक वॉरंट निघाले असून, त्याअंतर्गत अटक करून कारवाई न करता मदत करण्यासाठी शकील शेख हे 5 हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी
तक्रारीची पडताळणी 10 सप्टेंबर रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. यावेळी आरोपी हेड कॉन्स्टेबल शकील शेख यांनी अटक वॉरंटची कारवाई न करता मदत करण्यासाठी पंचासमक्ष 5 हजार रुपयांची मागणी केल्याचे ACBच्या अहवालात नमूद आहे. त्यानंतर तडजोडीअंती 3 हजार रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले.
पोलीस ठाण्यातच 3 हजारांची लाच स्वीकारताना पकडले
त्यानंतर ACBने सापळा कारवाई आयोजित केली. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून पंचासमक्ष 3 हजार रुपये स्वीकारताना शकील शेख यांना पकडण्यात आले. गंगापूर पोलीस ठाण्यातील एका कक्षात त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारल्याचे ACBने सांगितले. त्यानंतर त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 मधील कलम 7 अन्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ACB कडून देण्यात आली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजू बी. नांगलोत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल सिनकर आणि पोलीस हवालदार तोडकर यांचा समावेश होता.
कारवाईला पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.
लाच मागितल्यास ACB शी संपर्काचे आवाहन
भ्रष्टाचारासंदर्भात माहिती किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ACBकडून करण्यात आले आहे. घटक कार्यालयाचा टोल फ्री क्रमांक 1064 असून, छत्रपती संभाजीनगर घटक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0240-2344050 आहे.
What's Your Reaction?