एमआयएमने माझ्या विरोधात उमेदवार दिल्यास औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार - आमदार साजिद पठाण

 0
एमआयएमने माझ्या विरोधात उमेदवार दिल्यास औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार - आमदार साजिद पठाण

एमआयएमने माझ्याविरोधात उमेदवार दिल्यास औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार!

काँग्रेसचे आमदार तथा अल्पसंख्याक विभागाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष साजिद पठाण यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २८ (डी-२४ न्यूज) – एमआयएम हा पक्ष मुस्लिम समाजाचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे काम करत असून, तो जातीयवादी राजकारण करत आहे. अकोला येथे माझे राजकारण संपवण्यासाठी माझ्या विरोधात उमेदवार देण्याची तयारी एमआयएमकडून सुरू आहे. मात्र, मी कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही. माझ्या विरोधात उमेदवार दिल्यास मी औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, असा ठाम इशारा काँग्रेसचे आमदार तथा अल्पसंख्याक विभागाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष साजिद पठाण यांनी दिला. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले एमआयएम दादागिरीला घाबरु नका येणा-या काळात महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी जनतेमध्ये जाऊन काम करत राहा.

काँग्रेस पक्ष कार्यालयातील गांधी भवन येथे आयोजित मराठवाडास्तरीय बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष साजिद पठाण यांचा शहरात तसेच गांधी भवन येथे कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. गांधी भवनमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

पुढे बोलताना साजिद पठाण म्हणाले की, मी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करत आहे. मात्र, हे काही विरोधकांना बघवत नाही. एमआयएमच्या राजकारणासंदर्भातील अनेक बाबींची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे अशा राजकीय दबावाला मी बळी पडणार नाही. काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाऊन काम करावे. प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि विविध संघटनात्मक पदांची जबाबदारी दिली जाईल. कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही.

आगामी निवडणुकांपर्यंत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे राहिल्यास मुस्लिम व अल्पसंख्याक समाजातील नेत्यांना निवडणुकीत उमेदवारी कशी मिळत नाही, हे मी पाहतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. युवकांनी रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय सोडून संघटनात्मक कामावर लक्ष केंद्रित करावे. काँग्रेस पक्ष देशभरात मजबूत होत असून अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष सक्षम आहे. भाजपकडून मुस्लिम व अल्पसंख्याक समाजावर अन्याय करणारे धोरण राबवले जात असल्याचा आरोप करत समाजातील सर्व घटकांनी काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मराठवाड्यातील अल्पसंख्याक विभागाच्या विविध पदांसाठी सुमारे १२० नेत्यांची यादी आपल्याकडे आली असून, या यादीला पक्षाच्या हायकमांडची मंजुरी मिळाल्यानंतर नियुक्त्या करण्यात येतील. नियुक्त्यांमध्ये एकनिष्ठ आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही पठाण यांनी स्पष्ट केले.

खासदार डॉ. कल्याण काळे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

कार्यक्रमाची प्रस्तावना शहर जिल्हाध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांनी केली. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी संघटनात्मक नियुक्त्यांबाबत भूमिका मांडली. शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना द्यावी. केवळ लेटरहेड आणि व्हिजिटिंग कार्ड मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना पदे देऊ नयेत. शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांसोबत समन्वयाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच पक्ष संघटना मजबूत होईल, असे ते म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, जातीयवादी पक्षांच्या राजकारणामुळे काँग्रेसला निवडणुकांमध्ये अपेक्षित ताकद दाखवता आली नाही. स्वर्गीय माजी मंत्री डॉ. रफीक झकेरिया, स्वर्गीय अब्दुल अजीम, स्वर्गीय अमानुल्लाह मोतीवाला आणि स्वर्गीय काजी सलीम यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी या शहरात काँग्रेसची सत्ता मजबूत केली होती. मागील महापालिका निवडणुकीत गैरप्रकार झाले नसते, तर काँग्रेसचे 10 ते 15 नगरसेवक निवडून आले असते, असा दावाही खासदार काळे यांनी केला.

मुस्लिम समाजाला केवळ मतपेढी समजू नका : कमाल फारुकी

ज्येष्ठ काँग्रेस नेते कमाल फारुकी यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत घरचा आहेर दिला. काँग्रेसला मुस्लिम समाजाची मते हवी असतात; मात्र नेतृत्व आणि उमेदवारी देण्याची वेळ आली की मुस्लिम नेत्यांना बाजूला सारले जाते. व्यासपीठावर आणि बॅनर-पोस्टरवर मुस्लिम नेत्यांना स्थान दिले जाते, परंतु प्रत्यक्ष तिकीट वाटपाच्या वेळी त्यांना डावलले जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष साजिद पठाण यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवावेत. एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. मुस्लिम समाजाचा केवळ मतपेढी म्हणून वापर होत असल्याची भावना निर्माण झाल्याने समाज काँग्रेसपासून दूर जात आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसची सत्ता असताना मराठवाड्यातून किती मुस्लिम आमदार निवडून आले होते, याची माहिती देत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. मुस्लिम समाज काँग्रेससोबत येण्यास इच्छुक असून, त्यांच्या प्रश्नांची जाण ठेवून पक्षाने समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुसूचित जाती विभागाचे नेते तथा प्रवक्ते डॉ. पवन डोंगरे यांनी केले.

यांची होती उपस्थिती

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रभारी मोहम्मद अहेमद, मुफ्ती हारुण, जेष्ठ नेते इब्राहिम पठाण, मराठवाडा प्रभारी अब्दुल हाफीज, समन्वयक इसाक शेख, एस.पी. इनामदार, अब्दुल आमेर अब्दुल सलीम, कन्नडच्या नगराध्यक्षांचे पती जावेद खान, शेख खलिल, बीडचे फरीद सिराज देशमुख, महिला शहराध्यक्ष दीपली मिसाळ गुलाब पटेल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow