औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात प्राथमिक आकडेवारीनुसार 58.67 टक्के मतदान
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात प्राथमिक आकडेवारीनुसार 58.67 टक्के मतदान
आठ जिल्ह्यांतील 1 लाख 91 हजार 689 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक 62.53 टक्के मतदान ; मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 साठी आज छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. विभागातील 842 मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान झाले. निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेल्या तात्पुरत्या (Tentative) आकडेवारीनुसार, विभागातील एकूण 3 लाख 26 हजार 700 नोंदणीकृत मतदारांपैकी 1 लाख 91 हजार 689 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, 58.67 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक 62.53 टक्के मतदान झाले. ही आकडेवारी प्राथमिक स्वरूपाची असून, मतदान केंद्राध्यक्षांच्या दैनंदिनी व मतपत्रिकांच्या हिशेबाची पडताळणी केल्यानंतर अंतिम आकडेवारी निश्चित करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव व बीड या आठही जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक व्यवस्थेवर देखरेख ठेवली. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा, मतदान साहित्य व पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला होता.
धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक मतदान
जिल्हानिहाय मतदानाच्या आकडेवारीनुसार धाराशिव जिल्ह्यात 62.53 टक्के, परभणी जिल्ह्यात 61.81 टक्के, हिंगोली जिल्ह्यात 61.58 टक्के, जालना जिल्ह्यात 59.81 टक्के, नांदेड जिल्ह्यात 59.81 टक्के, बीड जिल्ह्यात 59.68 टक्के, लातूर जिल्ह्यात 56.45 टक्के, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 55.73 टक्के मतदानाची नोंद झाली.
मतदानाच्या संख्येनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 52 हजार 7, जालना जिल्ह्यात 19 हजार 853, परभणी जिल्ह्यात 16 हजार 482, हिंगोली जिल्ह्यात 6 हजार 352, नांदेड जिल्ह्यात 21 हजार 942, लातूर जिल्ह्यात 22 हजार 412, धाराशिव जिल्ह्यात 18 हजार 225, तर बीड जिल्ह्यात 34 हजार 416 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ
सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत 21 हजार 293 मतदारांनी मतदान केले. सकाळी 10 वाजेपर्यंत 6.52 टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत 68 हजार 77 मतदारांनी मतदान केले असून, ही टक्केवारी 20.84 वर पोहोचली. दुपारी 2 वाजेपर्यंत 1 लाख 17 हजार 686 मतदारांनी मतदान केले व मतदानाची टक्केवारी 36.02 झाली. त्यानंतरही मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली.
मतदान केलेल्या 1 लाख 91 हजार 689 मतदारांमध्ये 1 लाख 54 हजार 748 पुरुष, 36 हजार 940 महिला व एका इतर मतदाराचा समावेश आहे. या निवडणुकीत 41 उमेदवार रिंगणात असून, मतदारांनी मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून मतदानाचा हक्क बजावला.
मंत्री, विभागीय आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग
राज्याचे मंत्री इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनीही छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा येथील मतदान केंद्रावर सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मतदान केंद्र क्रमांक 109 वर मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे-चावरे यांनी वैजापूर व गंगापूर येथील मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रिया व व्यवस्थेची पाहणी केली. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निवडणूक नियंत्रण कक्षाची पाहणी करून मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला व उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी परभणी शहरातील शिवाजी महाविद्यालय येथील मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली.
विभागातील विविध मतदान केंद्रांवर महिला व पुरुष मतदारांचा सहभाग दिसून आला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त निवडणूक अधिकारी, कर्मचारी व पोलीस यंत्रणा दिवसभर कार्यरत होती.
27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी
05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, दि. 27 ऑक्टोबर 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा औद्योगिक परिसरात होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या सुरक्षित ठेवण्याची कार्यवाही निवडणूक
प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
What's Your Reaction?