कटकट गेट परिसर अतिक्रमण कारवाई टाय...टाय...फिश...

 0
कटकट गेट परिसर अतिक्रमण कारवाई टाय...टाय...फिश...

कटकट गेट अतिक्रमण हटाव मोहीम ‘टाय टाय फिश’... अशी चर्चा!

व्यापाऱ्यांनी स्वतःहून शेड आणि डिजिटल बोर्ड हटवले; महापालिकेचे अतिक्रमण पथक कारवाईसाठी फिरकलेच नाही

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- : शहरातील प्रसिद्ध कटकट गेट परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेची घोषणा करूनही महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक बुधवारी सकाळी कारवाईसाठी आले नसल्याने या मोहिमेची चर्चा सुरू झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडून कटकट गेट परिसरात उद्घोषणा करून बुधवारी सकाळपासून अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, बुधवारी प्रत्यक्षात कारवाईसाठी पथक परिसरात दाखल झाले नाही.

दरम्यान, कारवाईच्या घोषणेनंतर कटकट गेट बाजारपेठेतील तरुण व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत आपल्या दुकानांचे रस्त्यावर आलेले शेड आणि डिजिटल बोर्ड स्वतःहून हटवले. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने कारवाई करण्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याची भूमिका घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

व्यापाऱ्यांच्या या कृतीमुळे परिसरातील बाजारपेठेत चर्चेला उधाण आले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने जाहीर केलेली मोहीम प्रत्यक्षात का राबविण्यात आली नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

व्यापाऱ्यांच्या भूमिकेची चर्चा

कटकट गेट परिसरातील तरुण व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण हटवून प्रशासनाच्या कारवाईपूर्वीच पावले उचलली. व्यापाऱ्यांच्या या निर्णयाचे स्थानिक पातळीवर कौतुक होत असून, महापालिकेच्या नियोजित मोहिमेचे पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोशन गेट ते चंपा चौक अतिक्रमण काढताना मोठ्या प्रमाणात व्यापा-यांचे नुकसान झाले तरीही मनपाचा बुलडोझर थांबत नव्हता यामुळे प्रशासन व संबंधित नगरसेवकांवर नाराजी ओढवली होती आणि टिकेची झोड उठली होती. अतिक्रमण काढण्यास विरोध नाही परंतु मार्कींग व नोटीस दिली तर तेवढे अवैध बांधकाम काढण्यासाठी वेळ दिली असती तर व्यापा-यांचे नुकसान वाचले असते. याचा परिणाम कटकट गेट परिसरात असा झाला अगोदरच अतिक्रमण काढून व्यापा-यांनी नुकसान झाल्यापासून वाचले व मनपा प्रशासनाला सहकार्य केले यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. कार्यवाही टळली व जेसीबीने काढण्यासारखे येथे काही नसल्याने अतिक्रमण हटाव पथकाने पाठ फिरवली अशी चर्चा परिसरात सुरू झाली आणि हि कारवाई टाय.‌.टाय...फिश झाली अशीही चर्चा आहे.

गुलमंडी, टिव्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, गारखेडा परिसर व एमजीएम रोडवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow