निष्पक्ष व पारदर्शक निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज - विभागीय आयुक्त जी.श्रीकांत

 0
निष्पक्ष व पारदर्शक निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज - विभागीय आयुक्त जी.श्रीकांत

पदवीधर मतदार संघ निवडणूक 2026

निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकीसाठी

प्रशासन सज्ज-विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि.6 डिसेंबर 2026 रोजी मुदत संपणाऱ्या विधान परिषद सभासदांची निवड करण्यासाठी येत्या 23 ऑक्टोंबरला निवडणूक होणार आहे. यात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे,असे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी.श्रीकांत यांनी पत्रकारांना सांगितले.

विधान परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार आज विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी पत्रकारांशी संवाद साधून निवडणूक कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सह आयुक्त मंजुषा मिसकर यावेळी उपस्थित होत्या.

असा आहे निवडणूक कार्यक्रम...

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी पत्रकारांना निवडणूक कार्यक्रमाविषयी माहिती दिली. त्यानुसार मंगळवार दि.29 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध, मंगळवार दि.6 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख, बुधवार दि.7 ऑक्टोबर रोजी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी आणि शुक्रवार दि. 9 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे. शुक्रवार दि.23 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळात मतदान होणार आहे. मंगळवार दि. 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शनिवार 31 ऑक्टोबर 2026 पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.  

विभागीय आयुक्त जी.श्रीकांत म्हणाले की, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी दि.25 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर दि.12 जानेवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार, 2 लाख 88 हजार 783 मतदारांचा मतदार यादीत समावेश आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.

या निवडणुकीत मतदारांना मतपत्रिकेवर पसंतीक्रम देऊन मतदान करता येणार आहे. मतदारसंघासाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, पात्र मतदारांनी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त जी.श्रीकांत यांनी केले. या निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे सर्व तयारी करण्यात येत असून निवडणूक निर्भय, निष्पक्ष व पारदर्शकपणे राबविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे,असेही त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow