महापालिकेच्या रडारवर बाहेरून येणारे प्रतिबंधित प्लास्टिक, ट्रान्सपोर्टमधून 1080 किलो कॅरी बॅग जप्त...!

 0
महापालिकेच्या रडारवर बाहेरून येणारे प्रतिबंधित प्लास्टिक, ट्रान्सपोर्टमधून 1080 किलो कॅरी बॅग जप्त...!

महानगरपालिकेच्या रडारवर बाहेरून येणारे प्रतिबंधित प्लास्टिक

सार्को ट्रान्सपोर्टमधून 1,080 किलो प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅग जप्त; ₹25 हजारांचा दंड

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- शहरातील प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावर आणि विक्रीवर कारवाई करण्यासोबतच आता शहराबाहेरून छत्रपती संभाजीनगरमध्ये येणाऱ्या प्रतिबंधित प्लास्टिकवरही महानगरपालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. शहरात येणाऱ्या विविध मार्गांवर गस्त घालून प्रतिबंधित प्लास्टिकची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत सार्को ट्रान्सपोर्ट येथे कारवाई करून शालिमार प्लास्टिकचे मालक नाजीम शेख यांच्या नावाने पाठविण्यात आलेल्या प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅगचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत तब्बल 1080 किलो प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या असून, संबंधितांकडून ₹25,000/- दंड वसूल करण्यात आला.

महानगरपालिकेकडून आतापर्यंत शहरातील प्लास्टिक विक्रेते, घाऊक विक्रेते तसेच प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. मात्र, प्रतिबंधित प्लास्टिकचा पुरवठा शहराबाहेरून होत असल्याने आता प्लास्टिक शहरात प्रवेश करण्यापूर्वीच त्यावर कारवाई करण्याची रणनीती महानगरपालिकेने अवलंबली आहे.

या माध्यमातून शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा पुरवठा करणाऱ्या स्रोतांवरही थेट कारवाई करण्याचा मनपाचा प्रयत्न असून, प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापराला आळा घालण्यासाठी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

ही कारवाई महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने आणि उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) नंदकिशोर भोंबे यांच्या नियोजनानुसार करण्यात आली, कारवाईमध्ये नागरिक मित्र पथकाचे देविदास सुसर, विष्णू काकडे, मच्छिंद्र वाघ, कैलास भोसले, कैलास सोनवणे, बाबुराव सपकाळ तसेच जवान आनंद चावरीया यांनी सहभाग घेतला.

महानगरपालिकेने नागरिक, व्यापारी आणि प्लास्टिक विक्रेत्यांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, विक्री व साठवणूक टाळण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow