गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा महापौरांनी घेतला आढावा, खड्डे बुजविणे, एक खिडकी योजना, विसर्जनाचा घेतला आढावा

 0
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा महापौरांनी घेतला आढावा, खड्डे बुजविणे, एक खिडकी योजना, विसर्जनाचा घेतला आढावा

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा...

मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे, मंडप परवानगीसाठी एक खिडकी योजना व विसर्जन व्यवस्थेचा आढावा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक घेण्यात आली.

यावेळी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृह नेते गोविंद केंद्रे, नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल, मनपा आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय कोंबडे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंता, उपअभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे व पॅचवर्क, सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी तात्पुरत्या परवानग्या देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक खिडकी योजना, विसर्जन विहिरींची स्वच्छता व गाळ काढणे, कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था तसेच नवीन ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

मिरवणूक मार्गावरील पॅचवर्कचे काम सुरू असताना संबंधित वार्ड अभियंत्यांनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासावी. काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण होत असल्याची खात्री करूनच ते पूर्णत्वास न्यावे, अशा सूचना महापौर व पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

गणेशोत्सवाशी संबंधित सर्व कामांना आवश्यक प्रशासकीय मान्यता तातडीने पूर्ण करून घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

“गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात. मिरवणूक मार्ग, मंडप परवानगी, विसर्जन व्यवस्था, स्वच्छता आणि प्रकाशयोजना याबाबत कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. नागरिक व गणेश मंडळांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,” असे निर्देश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिले.

विसर्जनाच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यास विसर्जन प्रक्रिया बाधित होऊ नये, यासाठी जनरेटरची व्यवस्था करून पुरेशी प्रकाशयोजना करण्यात यावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

गणेशोत्सव काळात नागरिक, गणेश मंडळे व भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच उत्सवाची सर्व व्यवस्था नियोजनबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पडावी, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने व वेळेत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow