मुल्यांवरील निष्ठा, पालकांचे आशिर्वाद आणि कष्टाची तयारी असल्यास कोणीही यशस्वी होऊ शकतात - मनपा आयुक्त अमोल येडगे

 0
मुल्यांवरील निष्ठा, पालकांचे आशिर्वाद आणि कष्टाची तयारी असल्यास कोणीही यशस्वी होऊ शकतात - मनपा आयुक्त अमोल येडगे

मूल्यांवरील निष्ठा, पालकांचे आशिर्वाद आणि कष्टाची तयारी असल्यास कोणीही यशस्वी होऊ शकतात...! -

मनपा आयुक्त अमोल येडगे 

मौलाना आझाद महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ उत्साहात...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )दि.29(डि-24 न्यूज)- यशाच्या मार्गात अडथळे फार असतात. तुम्हाला काही मिळवायचे असेल तर मेहनत घ्यावी लागेल आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि कष्टाच्या बळावर तुम्ही हवे ते प्राप्त करू शकता. असे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. 

मौलाना आझाद महाविद्यालयात बुधवार (दि. 29) रोजी गुरू पौर्णिमेचे औचित्य साधत पदवी वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभास मनपा आयुक्त अमोल येडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम मौलाना आझाद शिक्षण सोसायटीचे अध्यक्ष फरहत जमाल यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या सेमिनार हाॅलमध्ये 11 वाजेला सुरू झाला. यावेळी काळे उद्योग समुहाचे संचालक अंकित काळे, एम. डी. पाटील व्हेंचरचे व्यवस्थापकीय संचालक अनिकेत पाटील, प्राचार्य डॉ. मजहर अहमद फारुकी, उपप्राचार्य डॉ. आरिफ पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. पुढे येडगे म्हणाले, नोकरी मिळणे हे यशस्वी होण्याचे परिमाण नाही. आपली मूल्ये जपणे, स्वतःप्रती प्रामाणिक राहत आणि अडथळांना पार करत आनंदी जीवन जगणे; हे यशस्वी होणे आहे. जीवनात खूप काही मिळविता येऊ शकते. त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत केली पाहिजे. मोठमोठी स्वप्ने पहा, मोठे ध्येय समोर ठेवा आणि ते प्राप्त करण्यासाठी कष्ट करा, तुम्ही यशस्वी व्हाल. असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

काळे उद्योग समुहाचे संचालक अंकित काळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वतःला सतत अद्ययावत केले पाहिजे. शिक्षण हे निव्वळ पैसा, नोकरी यासाठीच नसून तणावविरहित आणि समाधानी जीवनासाठीही आवश्यक आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाज उत्थानासाठी करायला हवा. विद्यार्थांनी सजग नागरिक बनून देशहित जपले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपात मा. फरहात जमाल यांनी पदवीधरांना शुभेच्छा देत पालकांचा त्याग आणि 

आपली मूल्ये न विसरण्याचे आवाहन केले. फरहत जमाल, अंकित काळे, अनिकेत पाटील आणि प्राचार्य डॉ. मजहर अहमद फारुकी यांच्या हस्ते 69 विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली. या सोहळ्याला महाविद्यालयात सर्व प्राध्यापकवृंद, पदवीप्राप्त विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ. अश्फाक शेख यांनी तर सूत्रसंचालन डाॅ. अपर्णा सराफ यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow