रोशन गेट अतिक्रमण कारवाई विरोधात एसडिपिआई रस्त्यावर...!

 0
रोशन गेट अतिक्रमण कारवाई विरोधात एसडिपिआई रस्त्यावर...!

रोशन गेट येथील बुलडोझर कारवाईविरोधात एसडिपिआईचा महानगरपालिकेसमोर

जोरदार निषेध; आयुक्त, महापौर व विरोधी पक्षनेत्यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यावे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)- रोशन गेट परिसरात करण्यात आलेल्या बुलडोझर कारवाईच्या निषेधार्थ सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI), औरंगाबादच्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी “महानगरपालिका आयुक्त होश में आओ”, “महापौर होश में आओ”, “विरोधी पक्षनेते होश में आओ”, “तानाशाही बंद करो” आणि “अवैध बुलडोझर कारवाई बंद करो” अशा घोषणा देण्यात आल्या.

रोशन गेट परिसरातील कारवाईदरम्यान योग्य कायदेशीर प्रक्रिया, नोटीस आणि नागरिकांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती का, याबाबत एसडिपिआईने गंभीर प्रश्न उपस्थित केले. प्रभावित दुकानदार व नागरिकांना न्याय मिळावा, कारवाईची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि प्रशासनाने या प्रकरणातील कायदेशीर तरतुदी, रस्त्याची अधिकृत हद्द, सर्वेक्षण अहवाल तसेच कारवाईची नोंद सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली.

या कारवाईत ज्या नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांचे नुकसान निष्पक्षपणे निश्चित करून, लागू कायदे व न्यायालयीन निर्देशांच्या अधीन राहून त्यांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी एसडिपिआईच्या वतीने करण्यात आली. तसेच, कारवाई बेकायदेशीर किंवा प्रक्रियात्मक त्रुटींनी बाधित असल्याचे आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई करताना कायद्याचे पालन करून नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करावे. आयुक्त, महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांनी या गंभीर प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करून जनतेला उत्तर द्यावे. प्रभावित नागरिकांना न्याय मिळेपर्यंत SDPI लोकशाही व संविधानिक मार्गाने आपला आवाज उठवत राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात सय्यद कलीम (महाराष्ट्र प्रदेश महासचिव), शाह समीर (जिल्हाध्यक्ष), मोहसीन खान (जिल्हा महासचिव), समीउल्लाह काझी (कोषाध्यक्ष), उमर मिर्झा (जिल्हा सदस्य), हाफिज अबुजर पटेल (पूर्व विधानसभा अध्यक्ष), सिराज सय्यद, समीर पटेल यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow