पोलिस आयुक्त प्रविण पवार यांचे आदेश, उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई...!
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचे आदेश; उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15 (डि-24 न्यूज) : शहरातील नागरिकांच्या निवासस्थानी, लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम तसेच जन्म-मृत्यूच्या प्रसंगी विनानिमंत्रण जाऊन जबरदस्तीने पैशांची मागणी करणे, धमकावणे तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास देण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश दि. 12 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12.01 वाजेपासून ते दि. 10 डिसेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील.
शहरातील काही गटांकडून, विशेषतः काही तृतीयपंथी व्यक्तींकडून लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम तसेच जन्म-मृत्यूच्या प्रसंगी नागरिकांच्या घरी विनानिमंत्रण जाऊन पैशांची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी नागरिकांना धमकावून त्यांच्या इच्छेपेक्षा अधिक पैसे देण्यास भाग पाडणे, अश्लील वर्तन करणे तसेच वाहतूक चौक आणि रस्त्यांवर वाहनचालक व प्रवाशांना अडवून पैशांची मागणी करण्याचे प्रकार घडत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्ती किंवा गटांना नागरिकांच्या निमंत्रणाशिवाय त्यांच्या निवासस्थानी अथवा आस्थापनांमध्ये भेट देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच वाहतूक चौक, रस्ते व सार्वजनिक ठिकाणी एकट्याने किंवा समूहाने एकत्र येऊन वाहनचालक, प्रवासी व नागरिकांकडून पैशांची मागणी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई...
या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 233 अन्वये दंडनीय असेल. आदेश यापूर्वी मागे घेण्यात न आल्यास तो दि. 10 डिसेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहे.
सर्व संबंधितांना वैयक्तिक नोटीस बजावणे शक्य नसल्याने हा आदेश एकतर्फी पारित करण्यात आला आहे. नागरिकांच्या माहितीसाठी प्रसारमाध्यमांद्वारे तसेच सर्व पोलीस ठाणे, सहायक पोलीस आयुक्त कार्यालये, पोलीस उपायुक्त कार्यालये, महानगरपालिका प्रभाग कार्यालये आणि तहसील कार्यालयांच्या सूचना फलकांवर आदेशाच्या प्रती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
नागरिकांना होणारा त्रास, सार्वजनिक उपद्रव आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी कळविले आहे.
What's Your Reaction?