गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई, मुख्य सुत्रधारासह 14 जणांवर गुन्हा दाखल...!
गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई; मुख्य सूत्रधारासह 14 जणांवर गुन्हा दाखल...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- शहरात गोवंशांची अवैध वाहतूक, खरेदी-विक्री व कत्तलीसाठी कार्यरत असलेल्या संघटित टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत टोळीचा प्रमुख जुबेर शफीक कुरेशी याच्यासह एकूण 14 आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आली असून, आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जीन्सी परिसरातून 131 गोवंशांची अमानुष कत्तलीतून सुटका करण्यात आली होती.
पोलिस आयुक्त श्री. प्रविण पवार यांच्या आदेशानुसार जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धडक कारवाई करण्यात आली. गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक व क्रूरतेने कत्तलीसाठी साठवणूक केल्याची गुप्त माहिती पोलिस प्रशासनाला मिळाल्यानंतर छापेमारी करण्यात आली. या कारवाईत अमानुष परिस्थितीत ठेवण्यात आलेल्या 131 गोवंशांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात यापूर्वी महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. तपासादरम्यान ही संघटित गुन्हेगारी टोळी आर्थिक फायद्यासाठी सातत्याने बेकायदेशीर कृत्य करत असल्याचे निष्पन्न झाल्याने मोका कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
मोका अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे:
जुबेर शफीक कुरेशी (टोळी प्रमुख), मोहम्मद अयुब कुरेशी,
मोहम्मद समीर मोहम्मद शरीफ कुरेशी, मुजिब उर्फ मुजाहिद अयुब कुरेशी, शेख कय्यूम कुरेशी उर्फ शेख अयुब कुरेशी,
सलीम कुरेशी पिता शेख चाँद कुरेशी, वसीम शकील उर्फ शफी कुरेशी, काजी कलीम अहमद काजी मोहम्मद शरीफ,
शेख रऊफ शेख युनुस यांच्यासह इतर आरोपींवर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई पोलिस आयुक्त श्री. प्रविण पवार, पोलिस उपायुक्त (गुन्हे) श्री. प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) श्री. अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. गजानन कल्याणकर व गुन्हे शाखेतील अधिकारी-कर्मचारी यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी शहरात गोवंशांची अवैध वाहतूक, कत्तल व तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम सुरू राहणार असून अशा गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.
What's Your Reaction?