नाशिकच्या प्रकरणाला तुळजापूरच्या घटनेपेक्षा माध्यमांकडून अधिक महत्त्व, इम्तियाज जलिल यांचा आरोप
नाशिकच्या प्रकरणाला तुळजापूरच्या घटनेपेक्षा माध्यमांकडून अधिक महत्त्व; इम्तियाज जलील यांचा आरोप...
संजय शिरसाट आणि मी एकाच वेळी तुरुंगात जाऊ, सरकारी यंत्रणांना मॅनेज केल्याचा आरोप; नाशिक प्रकरणावरून माध्यमांवरही साधला निशाणा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6 (डी-24 न्यूज) : नाशिक येथील टीसीएस प्रकरणात माझ्यावर गुन्हा दाखल करून सहआरोपी करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात नेमके कोणते आरोप लावण्यात आले आहेत, याची माहिती घेणार असून न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे. नीदा खान हिला न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी आवश्यक ती मदत करणार आहे. तिची जात कोणतीही असती, तरी अन्यायाविरोधात मी तिच्या पाठीशी उभा राहिलो असतो, धर्मांतराच्या विरोधात आमच्या पक्षाची भूमिका आहे असे स्पष्ट करत खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नाशिक टीसीएस प्रकरणात पोलिसांनी मला तीन वेळा बोलावून जबाब नोंदवला आहे. माझ्या एका भाषणातील व्हिडिओ क्लिपच्या आधारे आवाजाचे नमुनेही घेण्यात आले आहेत. या प्रकरणात माझे नाव समोर आल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीसाठी मुद्दा मिळाला. मात्र, तुळजापूर येथील गंभीर घटनेला माध्यमांकडून तितके महत्त्व दिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नीदा खानवर गुन्हा दाखल झाला, त्यावेळी ती घरी होती. ती तीन महिन्यांची गर्भवती असताना तिला मानसिक त्रास देण्यात आला, मग त्यावेळी पोलिसांनी तिला अटक का केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तिला न्यायालयीन प्रक्रियेत मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप...
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात कथित घोटाळ्याप्रकरणी अनेक पुरावे सरकारी यंत्रणांकडे दिले आहेत. एवढे पुरावे देऊनही संबंधित यंत्रणा त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत...? शिरसाट सर्व सरकारी यंत्रणांना कसे मॅनेज करत आहेत, असा आरोप जलील यांनी केला. एक दिवस असा येईल की संजय शिरसाट आणि मी दोघेही तुरुंगात सोबत जाऊ. त्यावेळी महागडी गाडी कशी खरेदी केली, स्टार हॉटेल खरेदीसाठी पैसे कुठून आणले आणि दमदाटी करून वर्ग-2 ची जमीन कशी खरेदी केली, याची माहिती ते मला देतील, अशी टीकाही त्यांनी केली.
माझ्याविरोधात आतापर्यंत 16 राजकीय गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी अनेक प्रकरणांत माझी सुटका झाली आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांना मी घाबरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तुळजापूरच्या घटनेवर माध्यमे गप्प का...?
तुळजापूर येथील प्रसिद्ध मंदिराच्या धर्मशाळेत समीर पटेल या 19 वर्षीय तरुणाला 15 ते 20 जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, येत्या 9 तारखेला त्याचे लग्न होणार होते. मारहाणीचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला असून त्यामध्ये माजी नगराध्यक्ष आणि मंदिराचे पुजारी दिसत असल्याचा दावा जलील यांनी केला. याच प्रकरणात आणखी एका तरुणालाही मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात पोलिसांनी केवळ तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगितले जात आहे. मग संबंधित पुजाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे का...? सर्व आरोपींना अटक झाली नाही, तर आपण स्वतः तुळजापूरला जाऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
नाशिकच्या घटनेला राष्ट्रीय माध्यमांनी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली; मात्र तुळजापूरमधील तरुणाच्या मृत्यूच्या घटनेला अपेक्षित प्रसिद्धी का दिली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्व वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना विनंती आहे की, नाशिकच्या घटनेप्रमाणेच अन्याय झालेल्या इतर घटनांनाही समान महत्त्व देऊन त्या जनतेसमोर आणाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
या सर्व मुद्द्यांवरून पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील माध्यमांवर चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरही जोरदार टीका केली.
What's Your Reaction?