अतिक्रमण कारवाई, रोशनगेटचा श्वास मोकळा, यानंतर कटकट गेट व जीन्सी रोडवर कारवाई...!
चंपा चौक ते रोशन गेट मार्ग अतिक्रमणमुक्त; महापालिकेची धडक कारवाई...! यानंतर चंपा चौक ते कटकट गेट आणि चंपा चौक ते जीन्सी रस्त्यावरील अतिक्रमणे काढणार असल्याचे संतोष वाहुळे यांनी सांगितले ...
6 जेसीबींच्या मदतीने 450 ते 460 अतिक्रमणे हटवली; नागरिकांना मोठा दिलासा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18 (डि-24 न्यूज) – शहरातील जुन्या शहरातील रोशन गेट ते चंपा चौक या प्रमुख मार्गावरील अतिक्रमणांचा विळखा अखेर दूर झाला आहे. आज सकाळपासून महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने झालेल्या कारवाईनंतर या रस्त्याचा श्वास मोकळा झाला. रुग्णवाहिका जाण्यासाठी व मोटारसायकल चालवणे नागरिकांना कठीण होत होते नेहमी या रस्त्यावर ट्राफीक जाम होत असल्याचे तक्रारी होत्या. आपले अतिक्रमण काढून घेण्यासाठी मनपा प्रशासनाने दोन दिवसांची मुदत दिली होती. एमजीएम रुग्णालय व आझाद चौक, सिडको जाण्यासाठी रहदारीला त्रास होता म्हणून आज हि कारवाई करण्यात आली. काही अतिक्रमणे स्वतः लोकांनी काढून घेत सहकार्य केले जे काढले नाही ते सहा जेसीबीच्या सहाय्याने काढले काही लोकांनी विरोध केला तरीही कारवाई सुरू होती. हि कारवाई सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. 450 ते 460 अतिक्रमणे काढण्यात आली. यानंतर चंपा चौक ते कटकट गेट आणि चंपा चौक ते जीन्सी पर्यंत कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली. सहा जेसीबींच्या साहाय्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमणे हटविण्यात आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी अधिक मोकळा झाला आहे.
अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळे...
चंपा चौक ते रोशन गेट हा जुन्या शहरातील महत्त्वाचा मार्ग असून, त्याची रुंदी 15 मीटर आहे. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने आणि इतर स्वरूपातील अतिक्रमणे वाढल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालताना अनेक अडचणी येत होत्या. या अतिक्रमणांमुळे रस्त्याच्या पूर्ण क्षमतेचा वापर करणेही कठीण झाले होते.
दोन दिवसांची मुदत; त्यानंतर कारवाई
दोन दिवसांची मुदत संपल्यानंतर शनिवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक सहा जेसीबी, दोन टिप्पर आणि दोन विद्युत वाहनांसह घटनास्थळी दाखल झाले.
कारवाई सुरू होताच काही दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने रस्त्यालगतचे अडथळे हटवत मोहीम वेगाने पूर्ण केली.
किरकोळ वादानंतरही मोहीम सुरूच
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान काही ठिकाणी किरकोळ वाद झाले. मात्र, संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी कारवाई सुरूच ठेवली. या मोहिमेत अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली 20 नागरिक मित्र सहभागी झाले होते.
यावेळी महापालिका उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त रफीक शेख, रमेश मोरे, लता भांडवले, भवन निरीक्षक रविंद्र देसाई, खरात यांच्यासह महापालिकेचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुन्हा अतिक्रमण होऊ नये, हेच खरे आव्हान
चंपा चौक ते रोशन गेट मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाहतुकीसाठी अधिक जागा उपलब्ध झाल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय कमी होण्याची अपेक्षा आहे.
मात्र, अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी महापालिका प्रशासनाला नियमित देखरेख ठेवावी लागणार आहे. अन्यथा काही दिवसांतच या मार्गाची स्थिती पुन्हा पूर्वीसारखी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिक्रमणमुक्त झालेला मार्ग कायमस्वरूपी मोकळा ठेवण्याचे आव्हान आता महापा
लिकेसमोर आहे.
What's Your Reaction?