उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सन्मान मिळाला नाही तर स्वबळावर लढणार निवडणूक, ओवेसींचे मोठे विधान

 0
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सन्मान मिळाला नाही तर स्वबळावर लढणार निवडणूक, ओवेसींचे मोठे विधान

एसआयआरच्या आधारावर एनआरसी होणार; समान नागरी कायद्यावरही ओवेसींचा घणाघात...

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सन्मान मिळाला नाही तर स्वबळावर लढणार निवडणूक, ओवेसींचे मोठे विधान...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 1 (डि-24 न्यूज) — “एसआयआरच्या आधारावर एनआरसी होऊ शकते. एसआयआर म्हणजे बॅकडोअर एनआरसी आहे,” असा गंभीर आरोप एमआयएमचे प्रमुख बॅ. असदुद्दीन ओवेसी यांनी केला. तसेच समान नागरी कायद्यामुळे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येण्याची शक्यता असल्याचे सांगत या कायद्याला विरोध करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसंदर्भातील कायद्याला आपण यापूर्वीच विरोध केला होता. तो कायदा बदलला नसता तर आज एवढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले नसते, असा दावा ओवेसी यांनी केला. नवीन कायद्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांना बदलने एवढे सोपे नाही असल्याने परिस्थितीत बदल करणे कठीण असल्याचेही त्यांनी म्हटले.

बिहारमध्ये एसआयआरला विरोध करण्यासाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली असून, या प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तो संविधानानुसार मान्य करावा लागेल, असे ओवेसी म्हणाले.

एसआयआरमध्ये ज्या मतदारांची नावे समाविष्ट झालेली नाहीत, त्यांना 12 ऑक्टोबरपर्यंत शेवटची संधी असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले. एसआयआरच्या माध्यमातून मोठ्या संख्येने मतदारांची नावे कमी झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

“सरकार एसआयआरच्या आधारावर एनआरसी करू शकते,” असा दावा करत ओवेसी यांनी आरएसएसचे पदाधिकारी आंबेकर तसेच आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या एनआरसीसंदर्भातील वक्तव्यांचा उल्लेख केला. मतदारांना एसआयआर प्रक्रियेत मदत करण्यासाठी एमआयएमने काही राज्यांमध्ये अॅपच्या माध्यमातून मदत सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

समान नागरी कायद्यावरही टीका

समान नागरी कायद्यावर टीका करताना ओवेसी म्हणाले की, या कायद्यामुळे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमआयएम या कायद्याला विरोध करणार असून, याबाबत संसदेत आवाज उठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुस्लिम समाजाच्या मालमत्ता, कार व इतर बाबींचा डेटा गोळा करण्यासाठी सरकारने आदेश दिल्याचा आरोपही त्यांनी केला. अमित शहा यांनी डेमोग्राफिक कमिटीच्या माध्यमातून असे आदेश दिल्याचा दावा ओवेसी यांनी केला.

“डेटा गोळा करायचा असेल तर अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी सर्वेक्षण करा. किती लोकांकडे घरे नाहीत, बेरोजगारी किती आहे, शिक्षणातील ड्रॉपआऊट रेट किती आहे, याचा डेटा गोळा करा. बेरोजगारांना रोजगार द्या. दुष्काळग्रस्त भागात उपाययोजना करा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा,” अशी मागणी त्यांनी केली.

एसआयआर प्रक्रियेत सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगताना ओवेसी यांनी आपल्या कुटुंबाचाही उल्लेख केला. जुळ्या मुलींच्या एसआयआर प्रक्रियेतही त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सहा मुले असलेल्या नागरिकांनाही प्रक्रियेत अडचणी येत असल्याचा दावा केला.

पूर्वजांची माहिती देणे अनिवार्य करण्यात आल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा फॉर्म क्रमांक सहाची प्रक्रिया असल्याचे सांगत त्यांनी या प्रक्रियेवर टीका केली.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या आंदोलनावर भूमिका

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलने सुरू असताना एमआयएम त्यात दिसत नसल्याबाबत विचारले असता ओवेसी म्हणाले की, “एमआयएम जनतेच्या दरबारात आहे. आम्ही विकासकामांवर लक्ष देत आहोत. वेळ आली तर रस्त्यावर उतरू.”

ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला तरी परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या आंदोलनाबाबत बोलताना, आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार असल्याचे ओवेसी म्हणाले. इंडिया आघाडीने सन्मानाने बोलावले तर त्यांच्या बैठकीला जाण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बिहारनंतर उत्तर प्रदेशातही स्वबळावर लढण्याचे संकेत

बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने आघाडीकडे सहा जागांची मागणी केली होती; मात्र त्या देण्यात आल्या नाहीत, असा दावा ओवेसी यांनी केला. त्यानंतर एमआयएमचे पाच आमदार निवडून आले, त्यापैकी चार आमदारांना पक्षांतर करावे लागले, असेही ते म्हणाले.

“त्यावेळी कोणी काही सांगितले नाही, मग आज आमच्यावर आरोप का केले जात आहेत?” असा सवाल त्यांनी केला. सत्ताधारी पक्षावरही त्यांनी निवडणुकीत ‘वोट चोरी’ करून सत्तेत आल्याचा आरोप केला.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक एमआयएम पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे ओवेसी यांनी स्पष्ट केले. कोणताही पक्ष एमआयएमसोबत येण्यास इच्छुक असेल तर त्यांचे स्वागत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये एमआयएमची ‘एकला चलो’ भूमिका राहण्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यांतून मिळाले.

या पत्रकार परिषदेला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, जिल्हाध्यक्ष शारेक नक्शबंदी आणि शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow