एसआयओची 21 ते 30 सप्टेंबर पर्यंत राष्ट्रव्यापी मोहिम

 0
एसआयओची 21 ते 30 सप्टेंबर पर्यंत राष्ट्रव्यापी मोहिम

'कुरआन - मानवते साठी मार्गदर्शन' SIO ची राष्ट्रव्यापी मोहिम 21 ते 30 सप्टेंबर पर्यंत 

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)

जग जसजसे भौतिक प्रगतीच्या मार्गावर जात आहे, आध्यात्मिकता आणि संस्कृतीपासून दूर होत चालले आहे. मानवी आयुष्यातील प्रगती ही तेव्हाच शाश्वत असू शकते जेव्हा त्यासाठी घेतलेल्या मार्गदर्शनाचा स्रोत शाश्वत असेल. 

तरुण अवस्थेत केलेली प्रगती ही वैयक्तिक तर असतेच शिवाय तिचा मोठा फायदा समाजालाही होतो. आजचा युवक जो समाजात पसरलेल्या अनैतिकतेचा शिकार आहे, त्याला प्रगती आणि आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. जर हे मार्गदर्शन शाश्वत असेल तर नक्कीच एका सुदृढ शाश्वत समाजाची पायाभरणी येथे होईल. 

जग खूप वेगाने प्रगती करत आहे. रोज नवनवीन शोध लावले जात आहेत, नवनवीन तत्त्वज्ञान तयार होत आहे आणि वेगवेगळ्या विचारसरणी व श्रद्धा वाढत आहेत. निश्चितच, बदलत्या काळात स्वतःला बदलावे लागते, जेणेकरून या नवीन युगाशी सामना करता येईल. मात्र यासोबतच मानवी जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवनवीन तत्त्वज्ञान मांडले जात आहे. परंतु हे तत्त्वज्ञान काही काळापुरते समाधान सूचवू शकते, पण ते कायमस्वरूपी आणि योग्य समाधान देण्यात अपयशी ठरले आहे.

खरेतर, आजपर्यंत कोणताही विचारवंत असा विचार मांडू शकला नाही जो प्रत्येक काळात सर्व समस्यांचे समाधान देऊ शकेल. आजही जग निराकरणाच्या शोधात आहे, पण योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरले आहे. तथापि, एक ग्रंथ असा दावा करू शकतो की तो संपूर्ण मानवजातीला कायमस्वरूपी समाधानाचा मार्ग दाखवेल. पवित्र कुरआन हाच तो ईशग्रंथ आहे जो प्रत्येक बाबतीत माणसाचे मार्गदर्शन करतो, त्याशिवाय दुसरा कोणता स्त्रोत यासाठी उपयुक्त ठरु शकेल? 

होय, एका अशा उपायाकडे निर्देश केला जात आहे की अखेर तोच संपूर्ण जगाला भल्याच्या मार्गावर आणू शकतो. सर्व समस्यांपासून सुटका व असंतोषात एकता याचे स्वप्न दाखवण्याचे सामर्थ्य फक्त याच ग्रंथात आहे.

होय, हाच तो ग्रंथ आहे ज्याबद्दल प्रसिद्ध लेखक रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले होते की "हे तेच पुस्तक आहे जे नेहमीच आशा आणि उत्साहाचे स्रोत राहिले आहे." याच ग्रंथाचा संदर्भ देऊन प्रसिद्ध कवयित्री आणि स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू ह्या आपल्या भाषणात म्हणाल्या की, "हे वाचले की असे वाटते की न्याय आणि समानतेची खरी कल्पना इथेच आहे. निश्चितच, जीवनाच्या प्रत्येक अंगात हे पुस्तक संपूर्ण जगासाठी योग्य आणि सर्वात उपयुक्त ठरू शकते."

खरं तर, हाच तो ग्रंथ आहे जो प्रत्येक काळात प्रकाशाचा स्रोत ठरला आहे. ज्याने याचा स्वीकार केला किंवा याची शिकवण मानली, तो समाज सत्तेचा आणि न्यायाचा आदर्श बनला. ज्याने याचा अवलंब केला, तो प्रत्येक संकटातून सुटका मिळवतो. मनःशांती आणि आत्म्याचा आनंद या ग्रंथाच्या शिकवणीत आहे. शांती आणि समाधान याच्याशी जोडलेले आहे.

या ग्रंथाने बुध्दीला धार दिली आहे. जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण करून त्यात यश मिळवण्यासाठी यापेक्षा चांगला कोणताही ग्रंथ नाही. हाच अंतिम ईशग्रंथ आहे, जो जगातील शेवटचे पैगंबर हजरत मोहम्मद(सअवस) यांच्यावर अवतरित झाला. हा जगातील एकमेव ग्रंथ आहे ज्याला सुमारे चौदा शतके झाली असली तरीही "कुरआन शरीफ" हा आजही पूर्ण तेजाने जगाला मार्गदर्शन करत आहे. यामुळे व्यक्तिमत्व आणि वर्तनात सौंदर्य आणता येते. आणि याच्याकडे ती विचारसरणी आहे जी संपूर्ण मानवजातीला शाश्वत उत्कर्षाकडे नेऊ शकते.

कुरआन हे समाजात नैतिकता प्रस्थापित करण्यासाठी परिपुर्ण आणि शाश्वत मार्गदर्शन आहे. त्याच मार्गदर्शनाचा अभाव समाजात जाणवत असल्याने स्टूडेंट इस्लामीक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या वतीने 'कुरआन - मानवतेसाठी मार्गदर्शन' ही राष्ट्रव्यापी मोहिम 21 ते 30 सप्टेंबर 2024 यादरम्यान राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत विविध शाळा आणि महाविद्यालयात व्याख्याने आयोजित केली आहेत. तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी जसे पोलिस प्रशासन, पत्रकार, डॉक्टर, वकील, विविध संस्थांचे मान्यवर, विचारवंत आणि समाज सुधारकांच्या भेटी घेऊन कुरआन बद्दल जनजागृती आणि संवाद साधला जाईल. अशी माहिती पत्रकार परिषदेत स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष(साऊथ)चे एहतेशाम हमी खान यांनी दिली. यावेळी सचिव मुसद्दिक अल मोईद, शहराध्यक्ष सय्यद तन्वीर, अश्फाक पठाण यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow