कापूस क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह

 0
कापूस क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा संभाजीनगर दौरा; कापूस उत्पादक शेतकरी व उद्योगांशी साधला संवाद...

कापूस क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

छत्रपती संभाजीनगर, दि.1(डि-24 न्यूज)- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात कापूस उत्पादक शेतकरी, कापूस प्रक्रिया उद्योगातील प्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत कापूस क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी त्यांचे स्वागत केले.

यंदाच्या दौऱ्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य लाभल्याने, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भेट देत त्यांचा सन्मान केला.

बीड बायपासवरील मंथन हॉल येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी कापसाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, वैज्ञानिक शेती पद्धती तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.

त्यानंतर मंत्री महोदयांनी शेती अवजारे व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनातील विविध स्टॉलना भेट देऊन माहिती घेतली आणि कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची पाहणी केली.

या कार्यक्रमास पालकमंत्री संजय शिरसाट, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मंत्री अतुल सावे, सीसीआयचे वरिष्ठ अधिकारी, वस्त्रोद्योग विभागातील अधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

सायंकाळी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी कापूस प्रक्रिया उद्योगाशी संबंधित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत उद्योगासमोरील अडचणी, मूल्यवर्धन, निर्यात, तंत्रज्ञानाचा वापर आणि उद्योगवाढीच्या संधी यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीस डॉ. भागवत कराड, नंदकिशोर कागलीवाल, मंजीत सिंह, रितेश शर्मा, गोपाल अग्रवाल यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow