रांजणगावात बाप लेकाच्या हत्याकांडाने खळबळ, दोन तासात पोलिसांनी पाच आरोपींना केली अटक...!
रांजणगावात बाप-लेकाची निर्घृण हत्या; दोन महिलांसह एकाच कुटुंबातील पाच आरोपी अटकेत...
जुन्या वादातून चाकूहल्ला; घटनेनंतर अवघ्या दोन तासांत पोलिसांची कारवाई
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) वाळूज महानगर परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील कृष्णानगर भागात जुन्या वादातून पिता-पुत्राची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सोमवारी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दुहेरी हत्याकांडप्रकरणी दोन महिलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या दोन तासांत अटक केली.
चाकूहल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू
बाबासाहेब रामदास कीर्तिकर (वय 43) आणि त्यांचा मुलगा निहाल बाबासाहेब कीर्तिकर (वय 19) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत साहिल आणि कुणाल बाबासाहेब कीर्तिकर हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी बाबासाहेब आणि निहाल यांना तपासून मृत घोषित केले.
नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी वादाला सुरुवात...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्तिकर कुटुंबातील साहिल हा कृष्णानगरमधील मारुती मंदिराजवळील नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी गेला होता. त्यावेळी संशयित राजेंद्र जयचंद आणि त्याचा मुलगा नागेश यांनी जुन्या वादातून साहिलला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे.
साहिलला मारहाण होत असल्याचे पाहून त्याचे वडील बाबासाहेब, भाऊ कुणाल आणि निहाल हे वाद मिटवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी राजेंद्र आणि नागेश यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी राजेंद्रचा दुसरा मुलगा मयूरही तेथे आला.
दरम्यान, राजेंद्रची पत्नी शानो हिने घरातून चाकू आणून नागेशच्या हातात दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर नागेशने निहालवर चाकूने हल्ला केला. यात निहाल गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. त्यानंतर बाबासाहेब यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांच्या माहितीत नमूद आहे. याचवेळी मयूर, मानसी आणि शानो यांनी कुणालला मारहाण केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात बाबासाहेब आणि निहाल गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी दोघांना तातडीने घाटी रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अवघ्या दोन तासांत पाच आरोपींना अटक
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांचे डायल 112 वर तैनात बीट मार्शल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फरार संशयितांचा शोध सुरू केला. मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरातून पाचही संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
राजेंद्र जयचंद (वय 53), शानो जयचंद (वय 52), नागेश जयचंद (वय 21), मयूर जयचंद (वय 20), मानसी जयचंद (वय 19)
घटनेनंतर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी ही कारवाई केली.
जुन्या वादातून हत्याकांड झाल्याचा संशय...
बाबासाहेब रामदास कीर्तिकर हे ट्रकचालक म्हणून काम करत होते. कीर्तिकर आणि जयचंद कुटुंबीयांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्या वादातून बाबासाहेब यांना मारहाण झाल्याचीही माहिती समोर आली आहे. याच जुन्या वादातून सोमवारी मध्यरात्री पुन्हा संघर्ष होऊन दुहेरी हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
एमआयडीसी वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी साहिल बाबासाहेब कीर्तिकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
What's Your Reaction?