मतदानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न हाणून पाडा - अॅड बाळासाहेब आंबेडकर

 0
मतदानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न हाणून पाडा - अॅड बाळासाहेब आंबेडकर

मतदानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न हाणून पाडा; अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे आवाहन

नव्या हुकूमशाहीविरोधात एकत्र येऊन लढण्याची गरज; बुद्धलेणीच्या पायथ्याशी 70 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात साजरा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20 (डि-24 न्यूज) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला मतदानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य आणि समानतेचा अधिकार दिला. मात्र, मतदारांची नावे वगळून हे अमूल्य स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला. मतदानाच्या हक्कावर गदा आणून नव्या हुकूमशाहीला निमंत्रण देण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी समाजाने वेळीच सावध होऊन एकत्रित संघर्ष करावा, असे आवाहन त्यांनी केले.

बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या धम्मभूमी येथे अशोका विजयादशमी आणि 70 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला सकाळपासूनच लाखो अनुयायांनी उपस्थिती लावत मोठ्या उत्साहात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा केला.

यावेळी भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो, डॉ. सूर्यकांताताई गाडे, प्रभाग सभापती करुणा जाधव, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, अॅड. रामेश्वर तायडे, गौतम खरात, कृष्णा बनकर आणि स्वागताध्यक्ष नगरसेवक डॉ. कुणाल खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

मतदानाचा अधिकार हेच स्वातंत्र्याचे प्रतीक...

अॅड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 मध्ये बुद्ध आणि धम्माच्या माध्यमातून देशाला नवा विचार दिला. मात्र, 70 वर्षांनंतरही आपण त्या विचारांनुसार वागत आहोत का, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जुन्या विचारांमधून काय सोडले आणि नवीन काय स्वीकारले, यावर समाजात चर्चा झाली पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे प्रचंड ज्ञान, शील आणि स्वाभिमानी जनता हे सर्वांत मोठे सामर्थ्य होते. आज आंबेडकरी समाजातील अनेक जण उच्चशिक्षण घेत आहेत; मात्र या शिक्षणातून सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचे पुरेसे भान निर्माण होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना त्यांनी मतदारांची नावे वगळण्याच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला ‘एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य’ हे तत्त्व दिले आहे. मतदान हा केवळ अधिकार नसून स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. हे स्वातंत्र्य टिकवायचे असेल, तर प्रत्येकाने मतदानाच्या हक्काच्या संरक्षणासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

पैसा म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, असे स्पष्ट करत त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे उदाहरण दिले. प्रत्येक युगात क्रांती आणि प्रतिक्रांतीचा संघर्ष सुरू असतो. पूर्वीच्या काळात जुन्या बेड्या होत्या, तर आता नव्या स्वरूपात बंधने लादण्याचे प्रयत्न होत आहेत. या प्रवृत्तीविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची मोठी जबाबदारी फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील जनतेवर आहे, असेही ते म्हणाले.

धम्मभूमीच्या विकासासाठी पाठपुरावा करणार

यावेळी भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी धम्मभूमीच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मागील 40 वर्षांपासून भिक्खू संघ धम्मभूमीच्या विकासासाठी संघर्ष करत आहे. धम्मभूमीला नोटीस मिळाल्यानंतर पाच लाख अनुयायांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 एकर जागा देण्याचे मान्य केले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या विषयावर केवळ चालढकल होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

यावर प्रतिक्रिया देताना अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढील वेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेताना आपल्यालाही सोबत घेण्यास सांगितले. धम्मभूमीसाठी जमीन मिळवून देण्याच्या प्रश्नावर आपण पाठपुरावा करू, अशी भूमिका त्यांनी मांडली.

विविध मान्यवरांची धम्मभूमीला भेट

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त सकाळी पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. दुपारच्या सत्रात मंत्री अतुल सावे, आमदार रोहित पवार, महापौर समीर राजूरकर, विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर, नगरसेवक काकासाहेब काकडे आणि चंद्रकांत हिवराळे यांनी धम्मभूमीला भेट देऊन अनुयायांना शुभेच्छा दिल्या.

कोक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या आई-वडिलांनीही धम्मभूमीला भेट दिली. यावेळी भिक्खू संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. परिसरात पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच रक्तदान शिबिर आणि अन्नदान यांसारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. दिवसभरात मोठ्या संख्येने अनुयायांनी उपस्थिती लावली.

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त पँथरच्या वतीने मिठाईचे वाटप...

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त भारतीय दलित पँथरच्या वतीने आंबेडकरनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि मेणबत्ती प्रज्वलित करून करण्यात आली. त्यानंतर बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.

डॉ. आंबेडकर चौक येथे ध्वजवंदन करून ध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी भारतीय दलित पँथरचे संस्थापक लक्ष्मणदादा भुतकर आणि सुरेश सोनटक्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी युवा नेते महेंद्र सोनवणे, प्रा. प्रकाश सोनवणे आणि अॅड. सिद्धार्थ गवई यांच्या हस्ते उपस्थित बांधवांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला लक्ष्मण भुतकर, महेंद्र सोनवणे, प्रा. प्रकाश सोनवणे, धम्मपाल दांडगे, दशरथ कांबळे, संजय सरोदे, सुरेश सोनटक्के, मधुकर आराख, जयदेव जाधव, रामदास पगडे, अॅड. सतीश राऊत, गौतम पगारे, धर्मा गवई, उत्तम डोंगरे, तसेच महिला आघाडीच्या सुभद्रा कासारे, पार्वती घोरपडे आणि लक्ष्मीबाई आगळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 उद्योजक विजय मगरे यांना ‘समाजरत्न 2026’ पुरस्काराने सन्मानित...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तथा उद्योजक विजय मगरे यांच्या सामाजिक कार्याची आणि धम्म चळवळीतील योगदानाची दखल घेत त्यांना ‘समाजरत्न 2026’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अशोका विजयादशमी आणि 70 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या धम्मभूमी येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो आणि पँथर रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख डॉ. सूर्यकांताताई गंगाधर गाडे यांच्या हस्ते विजय मगरे यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नगरसेवक डॉ. कुणाल खरात, गायक राजाभाऊ सिरसाठ आणि भिक्खू संघ उपस्थित होते. समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल विजय मगरे यांचे विविध स्तरांतून

अभिनंदन करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow