ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावपातळीवर उपस्थित राहून नागरीकांच्या समस्या सोडवाव्यात - जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी

 0
ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावपातळीवर उपस्थित राहून नागरीकांच्या समस्या सोडवाव्यात - जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी

ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावपातळीवर उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26 (डि-24 न्यूज) : ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयीन कामकाजापुरते मर्यादित न राहता गावपातळीवर प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या समजून घ्याव्यात व त्यांचे निराकरण करावे. ज्या गावांमध्ये स्वतंत्र कार्यालयाची सुविधा उपलब्ध नाही, तेथे ग्रामपंचायत कार्यालयातील स्वतंत्र खोली अथवा गावातील चावडी, सभागृह यांसारख्या उपलब्ध जागांचा वापर करून नागरिकांना सेवा द्यावी. अधिकाऱ्यांची गावातील प्रत्यक्ष उपस्थिती वाढल्यास नागरिकांच्या अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज वंदे मातरम् सभागृह येथे " मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची " एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड तहसीलदार शिवानंद बिडवे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) एकनाथ बंगाळे,यांच्यासह तहसीलदार, मंडळ अधिकारी तलाठी, ग्राम महसूल अधिकारी,कर्मचार्यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी संविधान दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी संविधानातील मूल्ये व तत्त्वांचे स्मरण करून देण्यात आले.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, पीक पाहणीच्या कामात नेटवर्क उपलब्ध नसल्याची अडचण अनेकदा मांडली जाते. मात्र, पीक पाहणीसाठी ऑफलाइन सुविधेचाही वापर करता येतो. नेटवर्क नसलेल्या भागातही जीपीएसच्या मदतीने पीक पाहणी करता येते. त्यामुळे नेटवर्कच्या अडचणींचे कारण पुढे न करता उपलब्ध तांत्रिक सुविधांचा योग्य वापर करून कामे वेळेत पूर्ण करावीत.

शासकीय सेवेत काम करताना नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या लक्षात घेणे आवश्यक आहे. समाजाच्या गरजा आणि नागरिकांच्या मागण्या सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे कामाचा व्यापही वाढणार आहे. अशा परिस्थितीत कोणते काम कशा पद्धतीने आणि कमी वेळेत प्रभावीपणे पूर्ण करता येईल, यासाठी प्रत्येकाने स्मार्ट पद्धतीने काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे कामकाज सुलभ करणारे महत्त्वाचे साधन आहे. पत्रांचे मसुदे तयार करणे, पंचनामे, अहवाल आणि इतर नियमित प्रशासकीय कामांचे प्रारूप तयार करण्यासाठी एआयचा उपयोग करता येतो. यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वतः वेळ देऊन या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घ्यावे. योग्य माहिती व आवश्यक तपशील देऊन एआयचा वापर केल्यास दैनंदिन कामकाजाचा वेळ वाचून कार्यक्षमता वाढू शकते.

मनुष्यबळाच्या कमतरतेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, गावपातळीवरील कामकाजासाठी कोतवाल आणि पोलीस पाटील यांची भरती प्रक्रिया सुरू असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सध्या जाणवणारी मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यास मदत होईल. उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य समन्वय साधून कामकाज सुरळीत ठेवावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

कार्यशाळेत गाव नमुना क्रमांक 1 ते 8 ऑनलाइन अद्ययावत करणे, ई-फेरफार प्रणालीतील प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्राची (Farmer ID) मंजुरी पूर्ण करणे, ओडीसी अहवालातील प्रलंबित बाबींची पूर्तता करणे, ई-पीक पाहणीतील प्लॉट मंजुरीची कामे पूर्ण करणे तसेच इतर अनुषंगिक कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचेही आवाहन केले. पाणी साठवण क्षमता वाढविणाऱ्या कामांमुळे भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यास मदत होईल, तसेच स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने संवेदनशीलतेने काम करून नागरिकांच्या प्रश्नांना तातडीने प्रतिसाद द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यशाळेच्या माध्यमातून ऑनलाइन महसूल कामकाजातील अडचणी, तांत्रिक सुविधांचा वापर आणि गावपातळीवरील सेवा अधिक प्रभावी करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन

करण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow