छत्रपती संभाजीनगरात रमाई घरकुल योजनेत कोट्यावधींचा गैरव्यवहार, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आमदार अंबादास दानवे यांची मागणी

 0
छत्रपती संभाजीनगरात रमाई घरकुल योजनेत कोट्यावधींचा गैरव्यवहार, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आमदार अंबादास दानवे यांची मागणी

छत्रपती संभाजीनगरात रमाई घरकुल योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार...

आमदार अंबादास दानवेंची दोषींवर कठोर कारवाईची मागणी...

मुंबई, दि.7(डि-24 न्यूज)- रमाई आवास घरकुल योजनेत बोगस कागदपत्रे, हाताने तयार केलेल्या लाभार्थी याद्या, अपात्र लाभार्थ्यांना मंजुरी, खोटी रेशनकार्डे व बनावट करपावत्या यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केला. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी सरकारकडे केली.

या प्रकरणात काही एजंट, संबंधित अधिकारी आणि इतर घटकांच्या संगनमतातून घरकुल योजनेचा गैरफायदा घेण्यात आला आहे. यापूर्वीही या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन करून चौकशीची मागणी केली होती, असेही अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

लाभार्थ्यांची यादी डिजिटल प्रणालीऐवजी हाताने तयार करण्यात आली आणि तीच कोणतीही शहानिशा न करता समाजकल्याण विभागाने मंजूर केली. महानगरपालिका, पीएमसी तसेच संबंधित अभियंत्यांनी स्थळ पाहणी न करता लाभ मंजूर केल्यामुळे अनेक अपात्र व्यक्तींना घरकुल मिळाले. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्याचा नियम असतानाही पती-पत्नी दोघांनाही स्वतंत्रपणे घरकुल मंजूर करण्यात आल्याचा आरोप दानवे यांनी केला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट करपावत्या आणि रेशनकार्डे तयार करून त्यांच्याही नावांचा गैरवापर करण्यात आला आहे. संबंधित कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे सांगत दानवे यांनी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. 

या संपूर्ण प्रकरणात महानगरपालिका, समाजकल्याण विभाग, पीएमसी आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. ज्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्य मंजुरी दिली, बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ मंजूर केले आणि योजनेचा गैरवापर होऊ दिला, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार का, असा सवालही अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला विचारला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow