जिल्हा परिषद नवीन इमारत फर्निचर निविदेवर संशय, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
14 कोटींच्या फर्निचर निविदेवर संशय; उच्चस्तरीय चौकशीची विद्या गायकवाड यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28 (डि-24 न्यूज) : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील सुमारे 14 कोटी रुपयांच्या फर्निचर कामाच्या निविदा प्रक्रियेवर जिल्हा परिषद सदस्य विद्या रमेश गायकवाड यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. ₹13.88 कोटींची आर्थिक रक्कम निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच कशी निश्चित झाली...? ठेकेदारांमध्ये संगनमत झाले आहे का...? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी हा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे.
PWD अधीक्षक अभियंता कार्यालयात एका खासगी कंत्राटदाराकडून तांत्रिक मान्यतेच्या फाईलचा पाठपुरावा होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणाचे सत्य समोर आणण्यासाठी संबंधित कार्यालयातील CCTV फुटेज, अभ्यागत नोंदवही आणि फाईल मूव्हमेंट रजिस्टर तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तसेच सर्वसाधारण सभेत मतदान न घेता ठराव पारित झाल्याचा दावा करत त्याची कायदेशीर वैधता तपासण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. संपूर्ण चौकशी होईपर्यंत कार्यादेश देऊ नये आणि काम सुरू करू नये, अशी मागणी विद्या गायकवाड यांनी केली आहे. प्रशासनाने कार्यवाही न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
What's Your Reaction?