नाशिक टिसीएस प्रकरणात इम्तियाज जलिल यांच्या विरोधात गुन्हा दाखल, या प्रकरणाला नवे वळण
नाशिक टिसीएस प्रकरणाला नवे वळण; माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल...
मतीन पटेल यांच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंगमुळे तपासाला नवी दिशा; निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपांची चौकशी सुरू...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) – नाशिकमधील बहुचर्चित टिसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नाशिकमधील टिसीएस कंपनीत कथित प्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात अनेक आरोपींची नावे समोर आली असून निदा खान ही प्रमुख आरोपींपैकी एक आहे. यापूर्वी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याविरोधातही याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मतीन पटेल यांच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग चर्चेत
या प्रकरणाच्या तपासादरम्यान एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मोबाईल फोनमध्ये काही महत्त्वाची रेकॉर्डिंग आढळल्याची माहिती समोर आली आहे. या रेकॉर्डिंगच्या आधारे तपास यंत्रणांनी इम्तियाज जलील यांच्या कथित सहभागाबाबत चौकशी सुरू केली. पोलिसांनी जलील यांचा जबाब नोंदवला असून त्यांचे व्हॉईस सॅम्पलही घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
या संदर्भातील माहिती विशेष तपास पथकाकडून (SIT) न्यायालयासमोर मांडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
जलील यांच्या भूमिकेवर तपास यंत्रणांचे लक्ष
निदा खान हिला आश्रय देण्याच्या प्रकरणात इम्तियाज जलील यांचा नेमका सहभाग काय होता, याचा तपास सध्या सुरू आहे. मतीन पटेल यांच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग, जबाब आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास यंत्रणा पुढील चौकशी करत आहेत.
What's Your Reaction?