पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबिर संपन्न, व्हाॅईस ऑफ मीडीयाचा पुढाकार...!
व्हॉईस ऑफ मीडिया व डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल तर्फे 100 हून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी; शिबिर उत्साहात संपन्न.
नेत्र तपासणीची उद्घाटन इंजिनीयर के एम आय सैय्यद यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- : कामगार दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया व डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी शिबिर बुधवार, 6 मे 2026 रोजी बायजीपुरा येथील नूर हॉस्पिटलमध्ये उत्साहात पार पडले. सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 या वेळेत झालेल्या या शिबिरात 100 हून अधिक लाभार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन इंजिनीयर के. एम. आय. सैय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी डोळ्यांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, आजच्या डिजिटल युगात विशेषतः पत्रकारांसारख्या सतत स्क्रीनसमोर काम करणाऱ्या व्यक्तींनी नियमित नेत्र तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढते. व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना देशासह जगभर कार्यरत असून पत्रकारांसाठी सातत्याने उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच अब्दुल कय्यूम, परवेज खान आणि डॉ. शेख शकील यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या शिबिराचे आयोजन व्हॉईस ऑफ मीडिया राज्य उपाध्यक्ष अब्दुल कय्यूम, राष्ट्रीय संघटक परवेज खान, डॉ. शेख शकील, अनिस रामपुरे, शेख मुख्तार, असद खान, संजय हिंगोलीकर आदींनी पुढाकार घेऊन केले. या उपक्रमात अनुभवी नेत्रतज्ज्ञांकडून सखोल तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक वैद्यकीय सल्लाही देण्यात आला.
विशेष म्हणजे, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या तज्ज्ञ टीममधील शेख मुख्तार, स्वप्निल निसर्गंध, तुषार अमृतफळे आदींनी प्रत्यक्ष नेत्र तपासणी करून शिबिर यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल कय्यूम म्हणाले की, पत्रकारांचे काम अत्यंत धावपळीचे आणि तणावपूर्ण असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. या शिबिराद्वारे पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देताना आनंद होत असून, भविष्यातही असे उपक्रम सुरू ठेवले जातील.
या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला. कार्यक्रमाला शेख असीम, अनिस रामपुरे, काजी नाझीमुद्दीन, फारुख पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
शेवटी व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे सर्वांना डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नियमित तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले.
डोळ्यांचे आरोग्य जपा – निरोगी दृष्टीसाठी एक पाऊल पुढे टाका!
What's Your Reaction?