पीएम स्वनिधी योजनेत महापालिकेला राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक

 0
पीएम स्वनिधी योजनेत महापालिकेला राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक

पीएम स्वनिधी योजनेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक

 

दिल्ली येथे मनपा आयुक्त अमोल येडगे व उपायुक्त अपर्णा थेटे यांचा पुरस्कार देऊन सन्मान...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 20(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर 

महानगरपालिकेने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत SVANidhi Samman Awards 2026 मध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल दिल्ली येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे व उपायुक्त श्रीमती अपर्णा थेटे यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी एन यु एल एम विभागाचे भारत मोरे आणि सुरेंद्र पाटील यांची देखील उपस्थिती होती. 

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेचा उद्देश कोविड-19 महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पथविक्रेत्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांचे व्यवसाय पुन्हा उभे करणे व आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मार्च 2026 पर्यंत 32,582 पथविक्रेत्यांना प्रथम कर्जाचा लाभ देऊन या योजनेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महानगरपालिकेने प्रथम कर्ज वितरणाच्या उद्दिष्टात शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.

महानगरपालिकेच्या या यशामध्ये आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे, उपायुक्त अपर्णा थेटे तसेच राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वयाने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

पथविक्रेत्यांचे आर्थिक सक्षमीकरण, व्यवसाय वृद्धी आणि त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महानगरपालिका यापुढेही प्रभावीपणे कार्यरत राहणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow