पोलिस अधिकाऱ्याशी अभिजित दिपके यांची शाब्दिक चकमक उडाली, म्हणाले तुम्ही कोण मला सांगणारे कोणाला भेटायचे कोणाला नाही...!
पोलिस अधिकाऱ्यांशी अभिजीत दिपकेंचा शाब्दिक वाद; “तुम्ही कोण मला सांगणारे...?”
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)- काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. दिपके यांनी अमेरिकेतून भारतात दाखल होत ‘नीट पेपरफुटी’च्या विरोधात आंदोलन उभे केले होते. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे जी-20च्या महत्त्वाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. याचदरम्यान अभिजीत दिपके यांचा पोलिस अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
“मला अडविण्याचे कारण काय?”
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिपके हे पोलिस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. “मला कोण अडवत आहे...? कोणत्या विभागाचे तुम्ही अधिकारी आहात...? तुमचे पोलिस स्टेशन कोणते आहे...? तुमच्याकडे कोणते पद आहे...? नाव काय आहे...?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
तसेच, “मी सीपी साहेबांना बोलतो, तुम्हाला काय त्रास आहे...? आजपर्यंत कोणाचा प्रॉब्लेम झाला नाही, मग माझाच का...?” असा सवालही त्यांनी केला. पोलिसांकडून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
‘तुम्ही कोण मला सांगणारे...?’
पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना काही सूचना केल्यानंतर दिपके यांनी त्यावर आक्षेप घेतला. “तुम्ही कोण मला सांगणारे...? मी कोणाला भेटायचे, कोणाला नाही हे मी ठरवणार आहे. लोक मला भेटायला येत आहेत आणि मी त्यांना आत घेत आहे,” असे ते म्हणताना दिसतात.
पोलिस अधिकाऱ्यांकडून बाहेर जाण्याची सूचना करण्यात आल्यानंतरही दिपके यांनी आपली भूमिका कायम ठेवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांशी हुज्जत घालणे योग्य की अयोग्य...?
या घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईबाबत तसेच दिपके यांच्या भूमिकेबाबत शहरात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे, आपल्याला विनाकारण रोखले जात असल्याचा दिपके यांचा आक्षेप असल्याचे व्हिडिओतून दिसून येते.
व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा
अभिजीत दिपके यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे यापूर्वीही ते चर्चेत आले आहेत. आता पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या शाब्दिक वादाचा व्हिडिओ समोर आल्याने या प्रकरणाची राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे.
What's Your Reaction?