निवडणूक पूर्वतयारी, जिल्हाधिकारी यांचा मतदान केंद्रनिहाय आढावा
निवडणूक पूर्वतयारीः जिल्हाधिकाऱ्यांचा मतदान केंद्रनिहाय आढावा
औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीचा मतदान केंद्रस्तरावर जाऊन आढावा घेतला. दिवसभरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचारी, तलाठी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, ग्रामसेवक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचे अधिनस्त कर्मचारी आदींचाही पूर्वतयारीबाबत आढावा घेतला.
मतदान केंद्राची पाहणी...
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व त्यांच्या अधिनस्त सर्व यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक पूर्वतयारी करीत आहेत. या पूर्वतयारीचा आज जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी मतदान केंद्रापर्यंत जाऊन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व निकषांनुसार केलेल्या तयारीची पाहणी केली. आज सकाळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जि.प. उच्च माध्यमिक कन्या शाळा छावणी, होली क्रॉस इंग्लिश शाळा छावणी, केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, नारेगाव, खैरुल्ला मोमीनीन उर्दू पूर्व – माध्य व प्राथमिक शाळा किराडपूरा अशा काही शाळांमधील मतदान केंद्रांची पाहणी केली. त्यांचे समवेत पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त स्वामी, चेतन गिरासे तसेच संबंधित क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांची निर्मिती करणे, दिव्यांगांसाठी सुविधा, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, पाळणा घरे, पिण्याच्या पाण्याची सुविधा इ. बाबत पाहणी केली. तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने पाहणी केली.
जिल्हाभरातील अधिकारी – कर्मचाऱ्यांची आढावा बैठक
जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदींचीही दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन मतदान केंद्रस्तरीय आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मिना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, मनपा अति आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त पांढरे, अपर्णा थेटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पूर्ण पालन करीत मतदार यादी, मतदान केंद्र या प्रत्येक स्तरावर परिपूर्ण पालन झाले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक बाब ही व्यक्तिशः खातरजमा करावी. जिल्हाधिकारी म्हणाले की, निवडणूकीसोबतच टंचाईच्या स्थितीवरही लक्ष ठेवावे. पाणी , चारा टंचाई इ. बाबी तात्काळ जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून उपाययोजना कराव्या. तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेबाबत दक्ष रहावे. आचारसंहितेची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्याबाबत सगळ्यांनी दक्षता बाळगावी.
आचारसंहिता अंमलबजावणीचे निर्देश...
अपर जिल्हाधिकारी डॉ. लोखंडे यांनी यावेळी आचारसंहिता अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. आचार संहिता अंमलबजावणीसाठी शासकीय इमारती, होर्डींग, पोस्टर, बॅनर, बसेस इ. वर प्रदर्शित जाहिराती, राजकीयपक्षांचे झेंडे, बॅनर निवडणूक जाहीर झाल्यापासून 72 तासांच्या आत हटविण्यात यावे. पदाधिकाऱ्यांकडे असणारी शासकीय वाहने जमा करावी, याबाबतही जिल्हाधिकारी स्वामी यांनी यंत्रणेला आदेश दिले.
What's Your Reaction?