मराठवाड्यातील इनामदारांचा न्यायासाठी एल्गार, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर केले भव्य धरणे आंदोलन...
मराठवाड्यातील इनामदारांचा न्यायासाठी एल्गार...
विभागीय आयुक्तालयासमोर धरणे, समान हक्क न मिळाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- मराठवाड्यातील हजारो इनामदार व भोगवटदार कुटुंबांना जमिनीच्या मालकी हक्काचा न्याय मिळावा आणि प्रस्तावित 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम-2026' अंतर्गत त्यांनाही समान हक्क व सवलती लागू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर भव्य एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
मराठवाड्यासह राज्यभरातील हजारो इनामधारक या आंदोलनात सहभागी झाल्याने परिसर घोषणांनी दणाणून गेला. या आंदोलनाचे आयोजन मराठवाडा इनाम जमीन हक्क परिषद (महाराष्ट्र राज्य) व दशनाम गोसावी समाज परिषद बीड (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. आंदोलनाला विविध सामाजिक, धार्मिक व पुजारी संघटनांचा मोठा पाठिंबा लाभला. यानंतर मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. शासनाच्या प्रस्तावित 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम-2026' मध्ये राज्यातील इतर भागांतील धार्मिक व धर्मादाय संस्थांच्या इनाम जमिनींसाठी विविध सवलती व हक्कांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र मराठवाड्यातील मूळ इनामदारांना या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले असून हा मोठा अन्याय असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकसमान व न्याय्य धोरण राबविण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. इनामदार शेतकरी असूनही त्यांना पीक विमा, कृषी अनुदान, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी राज्यअध्यक्ष ओमप्रकाश गिरी, ॲड. राजेंद्र बन, दत्ता महाराज गिरी, ॲड. जगदेव गिरी, संपत्ती पुरी महाराज, डॉ. मकरंद गिरी यांच्यासह शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते. मराठवाड्यातील इनामदारांना नव्या कायद्यांतर्गत समान न्याय न मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन, उपोषण आणि लोकशाही मार्गाने व्यापक संघर्ष उभारला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी योगेश गुलाबराव बन, संतोष देवपुरी गोसावी, भाऊसाहेब भारती, बाबासाहेब भारती, कैलास ओंकार गिरी, रमेश देविदास पुरी, वामन भगवान गिरी, बाबासाहेब रामभाऊ भारती, लक्ष्मण एकनाथ गिरी आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?