मिसारवाडी येथे मोकाट कुत्र्यांचा त्रास, एमआयएमच्या प्रयत्नाने डॉग स्काॅडने पकडले...
मिसारवाडीतून श्वान पथकाने पकडले सात मोकाट कुत्रे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डी-24 न्यूज) : शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील मिसारवाडी परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांकडून हल्ले करून चावा घेण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या श्वान पथकाने मिसारवाडीत कारवाई करत सात मोकाट कुत्र्यांना पकडले.
मिसारवाडी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांनी अनेकदा महापालिकेच्या श्वान पथकाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, वारंवार तक्रारी करूनही पथक येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. अखेर एमआयएमचे प्रभाग अध्यक्ष जमील पटेल यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर श्वान पथक मिसारवाडीत दाखल झाले.
यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी श्वान पथकाला सहकार्य केले. या कारवाईदरम्यान सात मोकाट कुत्र्यांना पकडण्यात आले, तर काही कुत्रे पळून गेली.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
परिसरात नागरिकांवर हल्ला करण्याचा धोका निर्माण करणाऱ्या आणि चावा घेणाऱ्या कुत्र्यांना पकडून नेण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच, महापालिकेने अतिरिक्त श्वान पथके पाठवून संपूर्ण प्रभागातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी एमआयएमचे औरंगाबाद मध्यचे शहराध्यक्ष जिशान देशमुख यांनी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
What's Your Reaction?