शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाची जागा पुन्हा केली अतिक्रमणमुक्त, मनपाची धडक कारवाई
महाविद्यालयाची जागा पुन्हा अतिक्रमणमुक्त; मनपाची धडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर, दि. 27 (डि-24 न्यूज): किल्लेअर्क परिसरातील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या जागेवर पुन्हा करण्यात आलेले अतिक्रमण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी धडक कारवाई करून हटविले. जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत पत्र्याचे शेड व पक्के ओटे जमीनदोस्त करण्यात आल्याने महाविद्यालयाची जागा पुन्हा अतिक्रमणमुक्त झाली.
महाविद्यालयाच्या सर्वे क्रमांक 3721 मधील जागेवर मर्दाना महाल, भूगोल विभागाची इमारत तसेच विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान आहे. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाचा प्रश्न कायम असून महापालिकेने यापूर्वीही दोन वेळा कारवाई केली होती. मात्र, अतिक्रमणकर्त्यांनी पुन्हा अनधिकृत शेड आणि पक्के ओटे उभारून जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला.
यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच क्रीडा उपक्रमांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. वैशाली देशमुख यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती.
तक्रारीची दखल घेत अतिक्रमण हटाव विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. कारवाईदरम्यान काही जणांनी जागेवर मालकी हक्काचा दावा करत विरोध केला. मात्र, अधिकाऱ्यांनी अधिकृत परवानगी व कागदपत्रांची मागणी केली असता संबंधितांकडून कोणतेही वैध दस्तऐवज सादर करण्यात आले नाहीत.
यानंतर महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने अवघ्या दोन तासांत सर्व अनधिकृत बांधकाम हटवून जागा मोकळी केली. या मोहिमेत सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई तसेच नागरिक मित्र पथकाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
महापालिकेच्या या कारवाईमुळे महाविद्यालयाची जागा अतिक्रमणमुक्त झाली असून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी संबंधित परिसरावर नियमित देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्या
त आले.
What's Your Reaction?