आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांचा आमरण उपोषणाचा इशारा...!

 0
आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांचा आमरण उपोषणाचा इशारा...!

आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांचा 3 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील हजारो ठेवीदारांची अनेक वर्षांपासून अडकलेली ठेव परत मिळावी, तसेच वसुली, जप्ती आणि लिलाव प्रक्रिया गतीने पूर्ण करून ठेवीदारांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदार संघर्ष कृती समितीने 3 ऑगस्ट 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील हजारो ठेवीदारांचे आयुष्यभराचे कष्टाचे पैसे अनेक वर्षांपासून अडकून पडले आहेत. प्रशासनाकडून जप्ती, वसुली आणि लिलावाची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे ठेवीदार आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटात सापडले आहेत. अनेकांच्या उपचार, मुलांचे शिक्षण, विवाह तसेच दैनंदिन उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले असून अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही.

समितीच्या प्रमुख मागण्या

पतसंस्थेच्या मालकीच्या सर्व स्थावर मालमत्तेचा तातडीने ताबा घेऊन ती विक्री करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत द्याव्यात.

तात्काळ लिलाव शक्य नसल्यास संबंधित मालमत्ता ठेवीदारांच्या ठेव रकमेच्या प्रमाणात वाटप करण्याचा निर्णय घ्यावा.

कर्जाची जाणूनबुजून परतफेड टाळणाऱ्या कर्जदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी.

एमपीआयडी (MPID) कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांची फास्ट ट्रॅक न्यायालयात दैनंदिन सुनावणी घेऊन लवकर निकाल द्यावा.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 101 अंतर्गत प्रलंबित वसुली प्रकरणांचा तातडीने निपटारा करून जप्ती, वसुली व लिलाव प्रक्रिया पूर्ण करावी.

महसूल, पोलीस आणि सहकार विभागाने समन्वयाने निश्चित कालमर्यादेत कार्यवाही पूर्ण करावी.

ठेवीदार प्रतिनिधी, प्रशासन व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा.

आर्थिक गैरव्यवहार, ठेवीदारांची फसवणूक आणि कर्ज परतफेड टाळणाऱ्या दोषींवर एमपीआयडी व अन्य कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी.

समितीने निवेदनात म्हटले आहे की, या मागण्यांबाबत तातडीने लेखी आदेश न दिल्यास 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सुमारे 300 ठेवीदार आमरण उपोषण व धरणे आंदोलन सुरू करतील. सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

तसेच, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रकरणातील विलंबाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याच्या सहकार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी समितीने केली आहे.

संघर्ष कृती समितीने आपण संविधानिक आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने तातडीने आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow