मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई, किती मालमत्ता सील केली वाचा बातमी...
मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई; 13 मालमत्ता सील
जप्तीच्या कारवाईदरम्यान 23.01 लाख रुपयांची वसुली; थकबाकीदारांना आयुक्तांचा इशारा
छत्रपती संभाजीनगर, दि. 15 (डि-24 न्यूज) : शहरातील मालमत्ता कराच्या थकबाकीदारांविरुद्ध छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने गुरुवारी धडक कारवाई केली. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार शहरातील विविध झोनमध्ये थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान एकूण 13 मालमत्ता सील करण्यात आल्या असून, मालमत्ता करापोटी लाखो रुपयांची वसुली करण्यात आली.
मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त (कर निर्धारक व संकलक) विकास नवाळे यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्व झोन कार्यालयांमार्फत ही कारवाई करण्यात आली.
नऊ झोनमध्ये कारवाई
महापालिकेच्या झोन क्रमांक 1 मध्ये दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. तसेच एका मालमत्ताधारकाकडून 1.50 लाख रुपये वसूल करण्यात आले. झोन क्रमांक 2 मध्ये दोन मालमत्ताधारकांकडून 4.82 लाख रुपये वसूल करण्यात आले.
झोन क्रमांक 3 मध्ये एक मालमत्ता सील करून एका मालमत्ताधारकाकडून 1.28 लाख रुपये वसूल करण्यात आले. झोन क्रमांक 4 मध्ये दोन मालमत्ता सील करण्यात आल्या, तर एका मालमत्ताधारकाकडून 3.56 लाख रुपये वसूल करण्यात आले.
झोन क्रमांक 5 मध्ये तीन मालमत्ता सील करून दोन मालमत्ताधारकांकडून 3.40 लाख रुपये वसूल करण्यात आले. झोन क्रमांक ६ आणि 7 मध्ये प्रत्येकी एक मालमत्ता सील करण्यात आली. झोन क्रमांक 7 मध्ये दोन मालमत्ताधारकांकडून 6.74 लाख रुपये वसूल करण्यात आले.
झोन क्रमांक 8 मध्ये तीन मालमत्ता सील करण्यात आल्या, तर झोन क्रमांक 9 मध्ये चार मालमत्ताधारकांकडून 1.61 लाख रुपये वसूल करण्यात आले.
दर गुरुवार आणि शुक्रवारी जप्तीची कारवाई
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दिवसभरात एकूण 13 मालमत्ता सील करण्यात आल्या. थकबाकीदारांकडून जवळपास 42.76 लाख एवढा मालमत्ता कर वसूल केला आहे. थकबाकीदारांकडून मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी यापुढे दर गुरुवार आणि शुक्रवारी अशाच प्रकारे जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
मालमत्ताधारकांनी आपला थकीत मालमत्ता कर तातडीने भरून अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी केले आहे. तसेच निवासी मालमत्तेतील एक खोली तसेच इतर स्थावर व जंगम मालमत्ताही सील करण्यात येतील, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
What's Your Reaction?