शेतीच्या बांधावरुन कॅबिनेट मंत्र्यांच्या भावाला व पुतण्याला मारहाण...!

 0
शेतीच्या बांधावरुन कॅबिनेट मंत्र्यांच्या भावाला व पुतण्याला मारहाण...!

कॅबिनेट मंत्र्याच्या भावाला मारहाण; जमिनीच्या वादातून भाऊ-पुतण्या जखमी...

शेती व रस्त्याच्या वादाला हिंसक वळण; बिडकीन परिसरातील घटनेने खळबळ...

पैठण, दि.10 (डि-24 न्यूज) — शेतीच्या बांधावरून तसेच रस्त्याच्या हक्कावरून सुरू असलेल्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची घटना पैठण तालुक्यातील नायगाव खंडेवाडी येथे घडली. या घटनेत राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू आणि पुतण्या यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.

या मारहाणीत अजित मोरेश्वर सावे (वय 70, रा. खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर) आणि अमेय अजित सावे (वय 35) हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नायगाव खंडेवाडी परिसरात शेती व रस्त्याच्या वादातून दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. यामध्ये अजित सावे आणि अमेय सावे यांना दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची पोलिसांकडून विचारपूस करून त्यांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, जखमींपैकी अजित सावे हे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू असल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र, या मारहाणीमागील नेमके कारण, सहभागी व्यक्ती आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow