हर्सुलमध्ये मेडीकल दुकानदाराची निर्घृणपणे हत्या, पोलिस आरोपींच्या शोधात पथके रवाना
हर्सूलमध्ये मेडिकल दुकानदाराची निर्घृणपणे हत्या...
दुकानातील वादातून 22 वर्षीय युवकावर हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना
छत्रपती संभाजीनगर, दि. 11 (डि-24 न्यूज) — हर्सूल परिसरात लाईफ लाईन मेडिकल दुकानावर झालेल्या वादातून एका 22 वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मृत युवकाची ओळख किराडपुरा, शरीफ काॅलनी येथील फैसल कादर शेख(वय 22) अशी झाली आहे. फैसल हा गेल्या दोन वर्षांपासून हर्सूल परिसरात मेडिकल दुकान चालवत होता. कुटुंबाला व्यवसायात मदत करण्यासोबतच तो नियमितपणे दुकानावर उपस्थित राहत होता.
शुक्रवारी सकाळीही फैसल नेहमीप्रमाणे दुकानावर आला होता. दुपारच्या सुमारास काही युवक दुकानावर आले. त्यावेळी फैसल आणि त्या युवकांमध्ये काही कारणावरून वाद झाला. बोलाचालीचे रूपांतर हाणामारीत झाले. याचवेळी आरोपींपैकी एका युवकाने चाकू काढून फैसलच्या पोटावर वार केल्याची माहिती आहे.
चाकूचा वार गंभीर झाल्याने फैसल खाली कोसळला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय
पोलिसांच्या प्राथमिक तपासात फैसल आणि काही युवकांमध्ये यापूर्वीही वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. काही युवक त्याच्या मेडिकल दुकानावर येऊन त्याला त्रास देत असल्याची माहितीही स्थानिकांकडून मिळाली आहे. शुक्रवारी झालेला वाद याच पार्श्वभूमीवर झाला होता की, त्यामागे अन्य काही कारण होते, याचा तपास हर्सूल पोलिसांकडून सुरू आहे.
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके सक्रिय
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, हर्सूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक स्वाती केदार आणि सहायक निरीक्षक सचिन सदाफुले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून माहिती घेत तपासाला सुरुवात केली आहे. हत्येत सहभागी संशयितांची नावे पोलिसांच्या तपासात समोर आली असून, त्यांच्या अटकेसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर...
फैसलच्या कुटुंबात आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. कमी वयात मेडिकल व्यवसायाची जबाबदारी सांभाळत कुटुंबाला हातभार लावणाऱ्या फैसलच्या अचानक झालेल्या हत्येमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि हत्येत सहभागी सर्व आरोपींची भूमिका तपासण्यासाठी हर्सूल पोलिसांकडून पुढील तपा
स सुरू आहे.
What's Your Reaction?