महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्येने खळबळ...

महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्येने जिल्ह्यात खळबळ...
सद्गुरु नारायणगिरी आश्रमातील घटना...
वैजापूर, दि.28(डि-24 न्यूज)
गंगापूर-वैजापूर महामार्गावरील चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात राहणाऱ्या ह.भ.प. संगीता पवार (50 वर्ष) यांची अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या केली. ही घटना 27 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून चोरीच्या उद्देशाने आश्रमात घुसलेल्या अज्ञातांनी ही हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ह.भ.प.संगीता पवार या मागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात वास्तव्यास होत्या. त्या अविवाहित असून, त्यांनी संन्यास स्वीकारला होता. परिसरात त्या कीर्तनकार म्हणून ओळखल्या जात होत्या आणि नियमितपणे कीर्तनाचे कार्यक्रम करत होत्या. 27 जूनच्या मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या या व्यक्तींनी संगीता पवार यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांची हत्या केली. यावेळी आश्रमाजवळील मोहटा देवी मंदिराची दानपेटीही चोरीला गेल्याचे नंतर उघडकीस आले.
शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मोहटा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले असता त्यांना आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडलेले दिसले. आत प्रवेश केल्यानंतर त्यांना संगीता पवार ह्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना आणि वैजापूर व विरगाव पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यावर वैजापूर पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेत, संगीता पवार यांना बेशुध्दावस्थेत उपचारासाठी वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले.
घटनेनंतर आमदार रमेश बोरनारे यांनी सांगितले घटनेची माहीती मिळताच याठिकाणी आलो. हि अत्यंत दुर्देवी घटना आहे. येथे सर्व पोलिस सज्ज झाले आहे लवकरात लवकर आरोपिंना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
What's Your Reaction?






