शहरात NIA च्या छाप्याने खळबळ, दोन संशयितांची 14 तास चौकशी करून सोडले

दोघांची 'NIA'कडून 14 तास चौकशी, दोन संशयितांना चौकशी करून सायंकाळी सोडले...
पहाचे 4 वाजता कारवाईने खळबळ, जैश-ए -मोहमंदशी संबंधित असल्याचा संशय...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) : पाकिस्तान येथील दहशतवादी संघटना जैश- ए मोहमंदशी संबंधित असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दहशदवाद विरोधी पथकाच्या मदतीने शहरातील दोघांची तब्बल 14 तास चौकशी केली. शनिवारी पहाटे 4 वाजता किराडपूरा आणि अल्तमश कॉलनी दोन ठिकाणी एकदाच छापे टाकून ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली. सकाळी 9 वाजता ATS च्या कार्यालयात नेऊन कसून चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान दोघांनाही नोटीस देऊन सोडून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.
एनआयएचे एक पथक पहाटे 4 वाजेच्या दरम्यान किराडपूरा येथे धडकले. पथकाने गावरान अंडे आणि मध विक्री करणाऱ्या व्यवसायिकाच्या घराचा दरवाजा ठोठावला. घरातील 45 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यानंतर संपूर्ण घराची छडती घेण्यात आली. दुसरे पथक अल्तमश कॉलनीत धडकले. त्याने धार्मिक ग्रथांचे बायडिंग करणारे आणि अरबी शिकविणाऱ्या 35 वर्षीय व्यक्तीच्या घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडल्यानतर पथकाने ओळखपत्र दाखवित आपण एनआयएकडून आले असल्याचे सांगितले. पथकामध्ये 7 ते 8 अधिकारी तर एक महिला कर्मचारी यांचा समावेश होता. घराची तपासणी आणि चौकशी करण्यासाठी आल्याचेही पथकाने सांगितले. त्यानंतर झडतीला सुरुवात झाली. संशयीतांचे आणि त्यांच्या पत्नीचे मोबाईल ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. घरातील कागदपत्रांची, बँक खात्याची तपासणी करण्यात आली. पथक एक एक वस्तूची तपासणी केल्यानंतर पुन्हा जागेवर ठेवली. पहाटे 4 वाजता सुरू झालेली तपासणी 9 वाजेपर्यंत सुरू होती. पथकाने दोघांकडून त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेतली. काम काय करतात, उत्पन्नाचे साधने काय, मागे काही दिवसांपूर्वी कोणत्या ठिकाणी जाऊन आले याची इतंभूत माहिती घेतली. तब्बल दोन तास विविध प्रश्न विचारून पथकाने माहिती घेतली. 9 वाजेच्या सुमारास या दोघांना अधिकच्या चौकशीसाठी घेऊन जात असल्याचे कुटुंबियांना सांगितले. चौकशी करून तासाभरात दोघांचीनाही सोडून देण्यात येईल, असेही पथकाने सांगितले. कारवाई झाल्याची माहिती मिळताच किराडपुरा भागात आणि अल्तमश कॉलनी भागात नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली.
त्यानंतर या दोघांना शहरातील एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले. त्या ठिकाणी 9 वाजेपासून ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. चौकशी केल्यानंतर नोटीस देऊन सायंकाळी साडे सहा वाजता दोघांनाही सोडून दिल्याची माहिती सूूत्रांनी दिली.
What's Your Reaction?






