मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे - काँग्रेस नेते धिरज देशमुख

 0
मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे - काँग्रेस नेते धिरज देशमुख

मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे - काँग्रेस नेते धिरज देशमुख 

तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे आवाहन, विभागीय आयुक्तांकडे काँग्रेस शिष्टमंडळाने निवेदन देत खराब झालेले पिक दाखवले, धाराशिव सारखे अतिवृष्टी पिकविम्याचा लाभ अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना देण्यासाठी निर्णय घ्यावा 

छत्रपती संभाजीनगर, दि.11 (डि-24 न्यूज) —17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते धिरज देशमुख यांनी केली आहे.

त्यांनी पुढे सांगितले पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, भूजल पातळीतही घट झाली आहे. पिण्याचे पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, तसेच पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली.

सुभेदारी विश्रामगृह येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वी त्यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत विविध मागण्यांचे निवेदन दिले.

देशमुख म्हणाले की, पावसाअभावी मराठवाड्यातील खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे. कापूस, मका, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी यासह विविध पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना महसूल यंत्रणा अद्याप बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यास तयार नसल्याची स्थिती आहे.

मराठवाड्यातील परिस्थिती लक्षात घेता विशेष पॅकेज जाहीर करावे, ‘मराठवाडा रब्बी पुनर्बांधणी योजना’ राबवावी, पाणी व चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. मृदा आर्द्रता, भूजल पातळी आणि प्रत्यक्ष पीक नुकसानीच्या आधारे गावनिहाय वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून पात्र तालुके व गावे तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावीत. तसेच शेतकऱ्यांकडील कर्जवसुली थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सध्याच्या दुष्काळाकडे केवळ कृषी क्षेत्राचे नुकसान म्हणून न पाहता शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील संकट म्हणून पाहण्याची गरज आहे. याबाबत शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे केल्याचे देशमुख यांनी सांगितले.

भारनियमन बंद करण्याची मागणी...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धरणे व तलावांमध्ये सध्या पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र दिवसा वीज कंपनीकडून भारनियमन सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे उपलब्ध पाणी असूनही ते पिकांना देता येत नसल्याची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी दिवसा होणारे भारनियमन तातडीने बंद करावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी केली.

यावेळी परभणीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, कल्याण दळे (जालना), सतीश पाचपुते (हिंगोली), विठ्ठल पावडे (नांदेड), राहुल सोनवणे (बीड) आणि अभय साळुंके (लातूर) यांनी आपापल्या जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती व पीक नुकसानीची माहिती दिली.

पीक विम्याची भरपाई द्यावी

सन 2023-24 मध्ये नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असतानाही त्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत, केवळ 72 तासांच्या आत नुकसान कळविले नसल्याच्या तांत्रिक कारणावरून शेतकऱ्यांना विमा भरपाईपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा लाभ केवळ धाराशिव जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा आणि त्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणीही माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली.

याप्रसंगी प्रकाश मुगदिया, शहर जिल्हाध्यक्ष एड सय्यद अक्रम, डॉ . जितेंद्र देहाडे, प्रो.मोहन देशमुख, जगन्नाथ काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow