हिमायत बागेचे जतन व संवर्धन गरजेचे - महापौर समीर राजूरकर
हिमायत बागेचे जतन व संवर्धन गरजेचे – महापौर समीर राजूरकर
मनपा-इंटॅक्टतर्फे हिमायत बागेत हेरिटेज वॉकचे आयोजन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- हिमायत बाग ही शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, त्यासोबतच हा परिसर शहराच्या ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या ऐतिहासिक व नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि INTACH यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिमायत बाग येथे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर राजूरकर बोलत होते.
यावेळी मनपा आयुक्त अमोल येडगे, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद, माजी खासदार इम्तियाज जलील, उपायुक्त अंकुश पांढरे, कार्यकारी अभियंता सचिन वायकर, जनसंपर्क अधिकारी अहमद तौसीफ INTACH चे आदित्य वाघमारे व इतर पदाधिकारी यांच्यासह नागरिक आणि इतिहास प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर राजूरकर म्हणाले की, हिमायत बाग परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि वारसा स्थळांचा नागरिकांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. यापुढील काळात 50-50 नागरिकांचे गट तयार करून समर पॅलेस, बारादरी, शक्कर बावडी, चांदणी चबुतरा, नहर आदी ऐतिहासिक वारसा स्थळांचा अभ्यास करण्यासाठी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
मनपा आयुक्त अमोल येडगे म्हणाले की, हिमायत बागेच्या रूपाने शहराला एक महत्त्वाचे ‘ऑक्सिजन हब’ तसेच समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी नागरिकांनीही सजग राहणे आवश्यक आहे. सकाळी व सायंकाळी या परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी परिसरात होणाऱ्या नशेखोरीसह अन्य गैरप्रकारांवर लक्ष ठेवून त्याबाबत पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
हिमायत बाग परिसरात लवकरच मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा आयुक्त येडगे यांनी यावेळी केली.
हेरिटेज वॉकदरम्यान INTACH च्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना हिमायत बाग परिसरातील समर पॅलेस, बारादरी, नहरी, ऐतिहासिक झाडे, नदीकाठ, कारंजे आदी ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा स्थळांची माहिती देत त्यांचा इतिहास आणि महत्त्व विशद केले.
What's Your Reaction?