29 सप्टेंबर रोजी रोजगार महाकुंभ, जिल्ह्यात 21 ठिकाणी भरती मेळावे

 0
29 सप्टेंबर रोजी रोजगार महाकुंभ, जिल्ह्यात 21 ठिकाणी भरती मेळावे

रोजगार महाकुंभ दि.29 रोजी; जिल्ह्यात 21 ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)- राज्यातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने “रोजगार महाकुंभ महाराष्ट्र 2026” हा उपक्रम संपूर्ण राज्यात मंगळवार दि.29 रोजी आयोजीत करण्यात आला आहे. या उपक्रमात अधिकाधिक युवक- युवतींनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त.राजु वाकुडे यांनी केले आहे.

 या उपक्रमांतर्गत राज्यभर एकाच दिवशी 800 रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही मंगळवार दि.29 रोजी आसावा ब्रदर्स कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय, सिडको, सीएसएमएसएस (CSMSS) छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, पैठण रोड, एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र, शेंद्रा एमआयडीसी, सीएसएमएसएस (CSMSS) पॉलिटेक्निक महाविद्यालय, पैठण रोड, सेतू चॅरिटेबल ट्रस्ट, भडकल गेट जवळ, देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), रेल्वे स्टेशन रोड, कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), खुलताबाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विद्यापीठ परिसर याशिवाय जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) जसे की गंगापूर, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, सोयगाव आणि सिल्लोड अशा विविध 21 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात दहावी व बारावी उत्तीर्ण उमेदवार, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार, डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीधारक, अल्पमुदतीचे कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार, आयटीआय उत्तीर्ण तसेच अंतिम वर्षातील प्रशिक्षणार्थी आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या पात्र युवक-युवतींना सहभागी होता येणार असून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

रोजगार मेळाव्याची ठिकाणे, सहभागी आस्थापना, उपललब्धता, रिक्तपदे इत्यादी माहितीसाठी https://shorturl.at/hU4fh या लिंकद्वारे किंवा सोबत दिलेला QR Code स्कॅन करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त राजु वाकुडे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow