सिंथेटिक ट्रॅकच्या कामाची विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी केली पाहणी
सिंथेटिक ट्रॅकच्या कामाची विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केली पाहणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 12 : विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी करून सिंथेटिक ट्रॅकच्या कामाची माहिती घेतली. याच ठिकाणी 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ट्रॅक तसेच महानगरपालिकेच्या सार्वजनिक बस सेवेतील नवीन बसेसचे लोकार्पण होणार असून, या कार्यक्रमाच्या तयारीचाही त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
कार्यक्रमासाठी मैदानातील बैठक व्यवस्था, विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती, पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रवेशद्वारे व बॅरिकेडिंगचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांसाठी मैदानात खुर्च्यांची व्यवस्था न करता अधिकाधिक नागरिकांना सामावून घेण्यासाठी खुली बैठक व्यवस्था करावी. व्हीआयपी मान्यवरांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
क्रीडा संकुल परिसरात ऑलिम्पियन व नामवंत खेळाडूंचे बॅनर्स तसेच मुख्यमंत्री यांच्या स्वागत व आभाराचे बॅनर्स लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. कार्यक्रमाची ध्वनिव्यवस्था उच्च दर्जाची व स्पष्ट असावी. तसेच गर्दीचे नियोजन करताना व्हीआयपी मान्यवर व सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वतंत्र प्रवेश व्यवस्था ठेवावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, महापालिका आयुक्त अमोल येडगे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?