7 सप्टेंबर रोजी दिशा समितीची बैठक, शासनाच्या योजनांचा खा.संदिपान भूमरे घेणार आढावा
दिशा समितीची 7 सप्टेंबर रोजी बैठक; केंद्र शासनाच्या योजनांचा खासदार संदिपान भूमरे घेणार आढावा...
प्रलंबित प्रकरणे व तक्रारी 25 सप्टेंबरपर्यंत खासदार कार्यालयात सादर करण्याचे नागरिकांना आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- जिल्ह्यात केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित प्रकरणे तसेच लाभार्थ्यांच्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी खासदार संदिपान भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा समिती)ची बैठक ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, दिशा समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील विविध केंद्र शासनाच्या योजनांशी संबंधित सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी व विकासात्मक योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे का, निधीचा योग्य विनियोग होत आहे का, लाभार्थ्यांची प्रकरणे कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहेत, तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी याबाबत संबंधित विभागांकडून माहिती घेण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी बांधव आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी यांनी त्यांच्या प्रलंबित प्रकरणांबाबतच्या तक्रारी, अडचणी अथवा महत्त्वाच्या मागण्या खासदार कार्यालयाकडे सादर कराव्यात, असे आवाहन खासदार संदिपान भूमरे यांनी केले आहे.
नागरिकांनी आपल्या तक्रारी व प्रलंबित प्रकरणांची छायांकित प्रत तसेच आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबरपर्यंत खासदार कार्यालयात सादर करावी, अथवा sandipanbhumare@gmail.com या ई-मेल आयडी वर पाठवावे जेणेकरून संबंधित विषयांचा पाठपुरावा करून ते दिशा समितीच्या माध्यमातून संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देणे शक्य होईल.
“केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वेळेत मिळणे आणि कोणतेही पात्र प्रकरण अनावश्यकपणे प्रलंबित राहू नये, यासाठी दिशा समितीच्या बैठकीत संबंधित विभागांकडून ठोस आढावा घेण्यात येईल. नागरिक व शेतकरी बांधवांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांची माहिती खासदार कार्यालयाकडे सादर करावी,” असे आवाहन खासदार संदिपान भूमरे यांनी केले आहे.
What's Your Reaction?