औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू
23 सप्टेंबर रोजी राजकीय पक्षांच्या विभागस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक
छत्रपती संभाजीनगर (डि-24 न्यूज), दि. 22(डि-24 न्यूज)- महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासह राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित आठ जिल्ह्यांमध्ये तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पाडण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.
निवडणूक कार्यक्रमानुसार 22 सप्टेंबर 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध, 6 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख, 7 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी आणि 9 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. मतदानानंतर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2026 पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
राजकीय पक्षांच्या विभागस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक
निवडणूक कार्यक्रम आणि आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या विभागस्तरीय अध्यक्ष व सचिवांची बैठक 23 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1.30 वाजता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस संबंधित राजकीय पक्षांच्या विभागस्तरीय अध्यक्ष व सचिवांना त्यांच्या स्तरावरून निमंत्रित करून उपस्थित राहण्याबाबत कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बैठकीच्या अनुषंगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे जिल्हानिहाय निवडणूक कामकाज, आदर्श आचारसंहितेचे पालन तसेच निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील आवश्यक बाबींवर चर्चा होणार आहे. बैठकीचे संपूर्ण नियोजन संबंधित कार्यालयामार्फत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ यांच्या माध्यमातून निवडणूक व्यवस्थेची आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी ही द्वैवार्षिक निवडणूक होत आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी लागू झालेली आदर्श आचारसंहिता 27 ऑक्टोबर 2026 रोजी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर संपुष्टात येईल.
What's Your Reaction?